रायगडचा गड शरद पवार भेदणार, शिंदे गटाचा नेता तुतारी हातात घेणार?
मागासवर्गीय तसेच कुणबी समाजाने निर्धार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Vidhan Sabha Election: रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती आणि माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन याबाबतीत सविस्तर चर्चा सुद्धा केली आहे. या भेटीत ते मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून ते इच्छुक उमेदवार असल्याचे म्हटलं जातंय.
कोण आहेत ज्ञानदेव पवार?
रायगडात ज्ञानदेव पवार हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात ग्रामपंचायत सदस्य, माणगावचे सरपंच, रायगड जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती त्यानंतर माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. जनसामान्यांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली आहे. राजकारणात धाडसी निर्णय घेण्यात मातब्बर आहेत. ते कुणबी समाजाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुध्दा आहेत. दुसरीकडे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात 60 टक्के कुणबी समाज विखुरलेला असल्याने या मतदार संघात जास्त ओबीसी कुणबी फॅक्टर जास्त चालत असल्याने त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो हे गणित डोळ्यासमोर ठेवून पवार यांनी हे पाऊल उचललं असावं असं एकंदरीत राजकीय वर्तुळात बोललं जातंय. शिवाय हा समाज सध्या सुनील तटकरे यांच्या जवळ जोडला असल्यानं त्यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी आता ही नवीन रणनीती अखली आहे.
दुसरीकडे या मतदार संघात कुणबी समाजाला नेतृत्व मिळतं नसल्याने समाजात तीव्र नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे. त्यामुळे यावेळी आपल्या समाजाचाच आमदार करण्यासाठी प्रयत्न करायचा असा चंग बांधलेला दिसत आहेत . कुणबी समाजाचा प्रत्येक निवडणुकीत केवळ वापर केला जातो. समाजाच्या मागण्या अनेक वर्षे झाली तरी पूर्ण न झाल्याने उपेक्षितच राहिला आहे अशी भावना आता व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे यावेळी कुणबी समाजाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकायचे अशी खूणगाठ पवार यांनी बांधली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता
महाराष्ट्रात सध्या शरदचंद्र पवार हे नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्यासाठी अनुकूल आहेत. महाविकास आघाडीत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा पारंपरिक पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदार संघांतून पक्षाचे चार वेळा आमदार निवडून आले असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडण्यात आली आहे असे आज तरी दिसत आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा शरद पवार यांच्या वाट्याला गेल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष असे चार प्रमुख पक्ष एकत्र लढाई लढल्यास ही लढत चुरशीची होऊ शकते. हे सर्व पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याने मुस्लिम आणि मागासवर्गीय तसेच कुणबी समाजाने निर्धार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ज्ञानदेव पवार काय म्हणाले?
जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना आणि वारा येईल तशी पाठ फिरवून पक्षाशी फारकत घेणाऱ्यांना यावेळी जनता धडा शिकवेल आणि 25 वर्षांची घराणेशाही आणि हुकूमशाही मतदार संघातील मतदार संपवतील असा विश्वास ज्ञानदेव पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार, अ. र. अंतुले, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांचीही मोठी राजकीय ताकद येथे आहे. यांचा कितपत फायदा होतो यावर सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत.
ज्ञानदेव पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार?
या मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने मजबूत पाया घातला आहे. मात्र शिंदे सेना आणि भाजप यांची ताकद नगण्य आहे. याची साथ राष्ट्रवादीला कितपत मिळेल यावर अवलंबून आहे. तरीही आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मात्र ज्ञानदेव पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर चमत्कार होऊ शकतो असे बोलले जात आहे.
हे ही वाचा :