Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
Dipesh Mhatre: डोंबिवलीतील युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतली होती. विधानसभेच्या तोंडावर हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
डोंबिवली: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे पक्षांतराच्या घडामोडींना वेग आला आहे. यापैकी डोंबिवलीतील पक्षांतराची घटना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता. दीपेश म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक होते. त्यामुळे दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांचा ठाकरे गटातील प्रवेश शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र, या सगळ्यामागे आता वेगळीच राजकीय समीकरणे असावीत का, अशी कुजबुज सध्या डोंबिवलीतील (Dombivli) राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपच्या संकटमोचकांपैकी एक असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना घेरण्यासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय मोहीम राबवली जात आहे का, अशी चर्चा होताना दिसत आहे.
डोंबिवली हा पूर्वीपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या 15 वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आपले बस्तान व्यवस्थितपणे बसवले आहे. एवढेच नव्हे या आधारावर रवींद्र चव्हाण यांनी आपली राजकीय ताकद वाढवत नेत मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण यांचे नाव हे भाजप नेतृत्त्वाच्या मर्जीतील नेते म्हणून घेतले जाऊ लागले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्यापासून रवींद्र चव्हाण हे कोकणातही आपली ताकद वाढवताना दिसत आहेत. परिणामी कल्याण-डोंबिवली पट्ट्यात रवींद्र चव्हाण यांचे मोठे प्रस्थ तयार झाले आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी सर्वपक्षीय पडद्यामागे एकत्र आले आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दीपेश म्हात्रेंच्या पक्षांतराची एवढी चर्चा का?
शिंदे गटाच्या युवासेनेचे सचिव असलेल्या दीपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटातील पक्षप्रवेश डोंबिवलीतील अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला होता. दीपेश म्हात्रे यांच्या पाठोपाठ या भागातील आणखी काही नगरसेवक ठाकरेंना जाऊन मिळतील, असा अंदाज होता. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ हालचाली करत ही पडझड रोखल्याचे सांगितले जाते. तरीही दीपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटातील पक्षप्रवेश अनेकांना बुचकाळ्यात पाडणारा आहे. या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीतच आव्हान उभे राहील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे बोलले जाते. तसे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे रवींद्र चव्हाण समर्थक आणि भाजप नेतेही सावध झाले आहेत.
आणखी वाचा