Walmik Karad Property: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पत्नींसह वाल्मिक कराडच्या नावे किती फ्लॅट, किती आहे एकूण किंमत?
Walmik Karad Property: वाल्मिक कराड याच्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. बीडसह पुणे, पिंपरी चिंचवड येथील उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडच्या आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात (Pune) अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या सोसायट्यांमध्ये अलिशान फ्लॅट वाल्मिक कराडने (Walmik Karad) घेतले आहेत. पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021 मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे हा अलिशान फ्लॅट आहे. तर एप्रिल 2016 मध्ये पिंक सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीतील टू बीएचके खरेदी करण्यात आला होता. हा फ्लॅट मंजली कराडांच्या नावे आहे. वाल्मिक कराड याच्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. बीडसह पुणे, पिंपरी चिंचवड येथील उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली.
पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा करण्यात आलेला होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरु असलेल्या असलेल्या एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या असल्याची माहिती काही दिवसांपुर्वी समोर आली होती.
कोणत्या ठिकाणी मालमत्ता?
पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021 मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला.
पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे.
पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा आहे.
कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे तीन फ्लॅट्स
ज्योती मंगल जाधव वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून तीच्या नावे पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स असल्याची माहिती एबीपी माझाकडे आहे. त्याचबरोबर या ज्योती मंगल जाधव आणि वाल्मिक कराड यांची दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आहे. ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसर मधील अॅमेनोरा पार्क टाऊनशीप मधे Sector R 21, Tower 33, floor 17, फ्लॅट 07 हा फ्लॅट Sector R 21 , Tower 33 , फ्लॅट 08 हा आणखी एक फ्लॅट Gera Greensville, फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. या फ्लॅटची किंमत दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे.
या ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या रहात असलेल्या इमारतीत कोट्यावधी रुपये खर्च करुन दोन ऑफीस स्पेसेस खरेदी करण्यात आल्याचेही समोर आलं आहे. त्याचबरोर वाल्मिक कराडच्या स्वतःच्या आणि पहिल्या पत्नीच्या नावे पिंपरि चिंचवडमध्ये दोन फ्लॅट असल्याचे देखील उघड झालं आहे. अशा अनेक मालमत्ता त्याच्या कुटूंबातील व्यक्तीच्या नावे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.