Pune Pubs: कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे,कारवाई न केल्यास... वसंत मोरेंचा इशारा
Pune News: पुण्यातील घटनेनंतर पब्ज आणि बड्या रेस्टोबारवर कारवाईला सुरुवात, कोरेगावमधील बड्या पब्जवर पालिकेची कारवाई. नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ?
![Pune Pubs: कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे,कारवाई न केल्यास... वसंत मोरेंचा इशारा Vasant More warns Murlidhar mohol after action against Waters pub cozy black Pub Orilla Pub in Koregaon park Pune Pune Pubs: कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे,कारवाई न केल्यास... वसंत मोरेंचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/31bb833f2add26cbbdecf720de4d9c6f1716449967341954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: कल्याणीनगर परिसरात एका बिल्डरपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर पुण्यातील नाईट लाईफचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. यानंतर प्रशासनाने नेहमीप्रमाणे सोपा उपाय म्हणून अपघात झालेल्या कोरेगाव परिसरात असणाऱ्या बार आणि पब्जवर धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला इशारा दिला आहे. संपूर्ण पुण्यात पब्ज आणि बार हे फक्त कोरेगाव पार्कमध्येच (Koregaon Park) आहेत का, असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला. कोरेगाव पार्कप्रमाणे पुण्यातील इतर भागांमध्ये कारवाई झाली नाही तर मी तेथली पब्ज आणि बारचे कोणत्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत, हे उघड करेन, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.
वसंत मोरे यांचा हा इशारा भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे. मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन कोरेगाव पार्क येथील अनधिकृत पब्जवर कारवाई करण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर पालिकेने काही पब्जच्या भागात तोडकामाची कारवाई केल्याचाही व्हीडिओही मुरलीधर मोहोळ यांनी शेअर केला होता. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी मोहोळ यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
वसंत मोरे उर्फ तात्यांनी फेसबुकवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे. सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे. नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ? कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील...पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे... अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल, असे वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुण्यातील कोणत्या पब्जवर कारवाई झाली?
पुणे महानगरपालिकेने बुधवारी कोझी अँड ब्लॅक (cozy black Pub), वॉटर्स (Waters) आणि ओरिला (Orilla Pub) या बड्या पब्जवर कारवाई केली होती. नियम न पाळल्याने पालिकेने बार आणि पबवर कारवाईचा बडगा उगारला होता. वॉटर्स आणि ओरिला हे दोन पब पुण्यातील नामांकित पब आहेत. या पबमध्ये विकेंडमध्ये तरुणांची फार गर्दी असते. रात्री बराचवेळ हे पब्स सुरु असतात. मागील अनेक महिन्यांपासून हे अनधिकृत पब पुण्यात होते. यापूर्वी या पबवर कारवाई करण्यात आली नव्हती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)