चंद्रभागा वाळवंटात गटारीचे पाणी वाहत असल्याने भाविक संतप्त, हातात झाडू घेत वारकऱ्यांकडून साफसफाई
वाळवंट सफाईसाठी मंदिर समितीने लाखो रुपयाचा ठेका दिला आहे. मात्र तरीही शेकडो वारकरी हातात झाडू घेऊन वाळवंट साफ करताना दिसत आहेत. किमान यात्रा काळात तरी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला द्यावेत, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली.
पंढरपूर : माघी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविक आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. मात्र भाविकांना चंद्रभागा वाळवंटात सर्वत्र गटारीचे पाणी वाहताना दिसत होते. अशा घाणीतच कीर्तन प्रवचने करण्याची वेळ आल्याने भाविक संतप्त झाले.
कोट्यवधी रुपये वारकऱ्यांच्या नावावर खर्च करणाऱ्या शासनाने किमान वाळवंट तरी साफ ठेवावे, अशा प्रतिक्रिया भाविकांमधून येत आहेत. शहरात भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासव गतीने सुरु आहे. त्यामुळे शहराचे ड्रेनेजचे पाणी थेट वाळवंटात मिसळत आहे.
यंदा मात्र वाळवंटाच्या सर्वच घाटावरुन हे पाणी थेट वाळवंटातून चंद्रभागेत मिसळत असल्याने अशा घाण पाण्यात स्नान कसे करावे आणि पाय कसे धुवावे, असा प्रश्न वारकऱ्यांसमोर पडला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका यात्रेला आलेल्या हजारो भाविकांना बसत आहे. वाळवंटातून हे घाण पाण्याचे प्रवाह चुकवून उड्या मारत भाविकांना चालावे लागत आहे.