मोठी बातमी : कारागृहाचे महानिरिक्षक जालिंदर सुपेकरांवर मोठी कारवाई, इकडे पत्रिकेत नाव सांगितलं, तिकडे चार्ज काढला!
जालिंदर सातपुते हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

पुणे : वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagawane) प्रकरणात वैष्णवीचे मामा सासरे आणि पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचेही नाव समोर आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्यासंदर्भातील अनेक पुरावे समोर आणत त्यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे 500 कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू असल्याची बाबही अंजली दमानिया यांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच, वैष्णवी प्रकरणात हगवणे यांच्याकडून जालिंदर सुपेकर यांच्या नावाने धमकी देत कस्पटे कुटुंबीयांवर व पोलिसांवर (pune) दबाव टाकल्याचेही समोर आले होते. त्यानुसार, आता जालिंदर सुपेकर (Jalinder suprekar) यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येते. आजच वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावेळी, पत्रकार परिषदेत जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे म्हटले होते, मुलाच्या जन्मपत्रिकेत मामा म्हणून त्यांचे नाव आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर, काही वेळातच त्यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेतल्याचे समोर आलं आहे.
जालिंदर सातपुते हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. वैशनव हगवणे प्रकरणात सुपेकरांवर आरोप झाले आहेत.
"कारागृह उप महानिरीक्षक" हे कारागृह विभागातील अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे पद आहे. सध्या कारागृह विभागाच्या "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गात 5 पदे मंजूर आहेत. त्यांपैकी 2 पदे भरलेली असून 3 पदे रिक्त आहेत. जालिंदर सुपेकर यांच्याकडे "विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे" या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गातील पाच पदांपैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा (नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार आहे. मात्र, आता शासनाने सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर येथील त्यांच्याकडे असलेली जबाबदारी काढून घेण्यात आल्याने ही त्यांच्यावर मोठी कारवाई असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
जालिंदर सुपेकर यांच्याकडून हा पदभार काढून घेतल्यानंतर, नागपूरची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव आणि नागपूरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे या तीन अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.
शासनाच्या आदेश पत्रात नेमकं काय?
"विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे" हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतर महत्वाचे पद आहे. त्यामुळे, जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या उचित नाही, असे संबंधित आदेशात म्हटलं आहे. तसेच, "कारागृह उप महानिरीक्षक" या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार "विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे" या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिका-याकडे सोपविणे योग्य नाही. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडील "कारागृह उप महानिरीक्षक" या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.























