Vaishnavi Hagawane Death Case: सुशील, राजेंद्र हगवणे अन् निलेश चव्हाणची एकत्र चौकशी; धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता
Vaishnavi Hagawane Death Case: आरोपी निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे या तिघांना बावधन पोलिस ठाण्यात एकत्र चौकशीसाठी आणण्यात आलं आहे.

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आठ दिवस फरार असलेला आरोपी नीलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याचा सहभाग होता किंवा नाही? या संदर्भात निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे यांना समोरासमोर बसवत चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे निलेश चव्हाणचा शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्या लग्न बैठका तसेच दोघांच्या वादामध्ये सहभाग होता, वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील याच्या मदतीने सासू लता नंनद करिष्मा यांचे मोबाईल त्यांनी नेले आहेत. या सर्वांना समोरा-समोर बसून याची चौकशी बावधन पोलीस करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे या तिघांना बावधन पोलिस ठाण्यात एकत्र चौकशीसाठी आणण्यात आलं आहे. निलेश चव्हाणच्या आणि हगवणे बाप लेकांच्या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
निलेशच्या घरात पोलिसांना काय सापडलं?
निलेशच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल आणि पासपोर्ट या वस्तू जप्त केल्या. पोलिसांकडून निलेशची कसून चौकशी केली जाते आहे. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे मोबाईल निलेशच्या घरी आढळून आले. निलेश चव्हाणकडून याआधी 3 मोबाईल जप्त केले. शनिवारी आणखी 3 फोन जप्त केले. जप्त मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती बावधनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.
निलेश चव्हाणसाठी फेसटाईम कॉल ठरला धोक्याचा
निलेश चव्हाणच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळं त्याच्या पहिल्या लोकेशनचा क्लु पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाला. तर फेसटाईम कॉलने निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झालं आणि त्यानंतर दहा दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या. 26 मे ला नेपाळमध्ये पोहचताच निलेशने तिथले सिम कार्ड घेतलं. याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला, याद्वारे त्याने अँपल फोनमधील फेसटाईम कॉलिंग केलं. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही, असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागाने मोठा कस लावला आणि फेसटाईम कॉलिंगचे आयपी अड्रेस मिळवले. या आधारे त्यांना निलेशचे नेपाळमधील लोकेशन प्राप्त झाले. त्यामुळं निलेशला भारतात घटस्फोटित मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं आणि नेपाळमध्ये फेसटाईम कॉलिंग करणं भोवल्याचं दिसून आलं.
फिरायला जाऊ म्हणून मैत्रीणीला सोबत घेतलं
निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. आपण फिरायला जाऊ असं त्याने त्याच्या मैत्रिणीला सांगून तिला सोबत ठेवलं आणि तिच्या फोनचा वापरही केला. पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला. तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली, परंतु तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलं. मात्र तिच्याकडून दिल्लीतून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खासगी बसची माहिती मिळाली आणि तिथेच पोलिसांनी निलेश चव्हाणला बेड्या घातल्या.
























