(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare reaction On Advay Hire Case : अद्वय हिरेंनी शिवसेना सोडून भाजपसोबत येतो म्हणावं, लगेच कारवाई थांबेल; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!
अद्वय हिरे यांनी अगदी आज या क्षणाला जरी म्हटलं की मी शिवसेना सोडून भाजपसोबत यायला तयार आहे तर त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाई जागच्या जागी थांबून जातील, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
Sushma Andhare On Advay Hire पुणे : शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. "अद्वय हिरे यांनी अगदी आज या क्षणाला जरी म्हटलं की मी शिवसेना सोडून भाजपसोबत यायला तयार आहे तर त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाई जागच्या जागी थांबून जातील", अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire ) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) भोपाळमधून (Bhopal) ताब्यात घेतले आहे. अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
रेणुका सूतगिरणीकडून (Renuka Mill) साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, 70 हजार कोटींचा घोटाळा 72 तासांच्या आत नजरेआड होऊ शकतो. व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे हसन मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये प्रचंड फेऱ्या मारत होते. पण त्यांनाही क्लिन चीट मिळू शकते. मोहित कंबोजच्या शेकडो कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी क्लिन चीट देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. प्रसाद लाड यांनाही क्लिन चीट मिळू शकते. बालाजी पार्टीकल्स प्रकरणी किरीट सोमय्या वाशीम, यवतमाळला फेऱ्या मारतात, मात्र त्याच खासदार भावना गवळी पुढे मोदींच्या आवडत्या विहीण होतात. आता अद्वय हिरे सध्या ठाकरे गटात आहेत. अद्वय हिरे यांनी अगदी आज या क्षणाला जरी म्हटलं की मी शिवसेना सोडून भाजपसोबत यायला तयार आहे, तर इतरांसारखी त्यांनादेखील क्लिन चीट मिळू शकते. तर मला वाटतं त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाई जागच्या जागी थांबून जातील. साडेसात कोटीच्या अनियमिततेपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा अपराध काय आहे तर ते भाजपच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत.
आठ वर्ष जुनी केस
यावर्षी एप्रिल महिन्यात अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक (Nashik) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव (Maleagaon) शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
इतर महत्वाची बातमी-
Advay Hire detained : ठाकरेंचा आणखी एक शिलेदार अडचणीत, उपनेते अद्वय हिरे भोपाळमधून ताब्यात