Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यात गोंधळ; डोर्लेवाडीतील रस्त्यावरुन राष्ट्रवादीचेच दोन गट आमने-सामने
बारामती लोकसभा दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे डोर्लेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधत असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात गोंधळ झाला. डोर्लेवाडीतील रस्त्यावरुन हा गोंधळ झाला
Supriya Sule: बारामती लोकसभा (baramati) दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) डोर्लेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधत असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात गोंधळ झाला. डोर्लेवाडीतील रस्त्यावरुन हा गोंधळ झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती लोकसभा दौऱ्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील तेरा गावांचा दौरा आयोजित केला होता.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून जेजुरी ते नीरा नरसिंहपूर या राज्यमार्गाचे काम सुरु आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा, असं एका गटाचं मत आहे तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले.
सुप्रिया सुळे दौऱ्यावर आल्यानंतर यासंदर्भात एका ग्रामस्थाने त्याची अडचण सांगितली आणि बघता बघता अनेक जण उठून यात स्वतःची भूमिका मांडू लागले आणि त्यातून गोंधळाला सुरुवात झाली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व ग्रामस्थांचे मत ऐकून घेतले आणि ग्रामस्थांची समजूत घालत यातील नेमका वाद समजून घेतला.
विरोधी पक्षनेते अजित पवार, मी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यानंतर गोंधळ शांत झाला. दरम्यान याविषयीचा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरु होता. मात्र सुप्रिया सुळे यांनी एका एका ग्रामस्थांची बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सर्वांना समजून सांगितले.
राष्ट्रवादीच्याच दोन गटामध्ये वाद
दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्याच दोन गटांमध्ये वाद झाल्याने सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ एकमेकांचं ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे कार्यलयात मोठा गोंधळ झाला. फार गोंधळ करु नका, अशी विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली त्यावेळी ग्रामस्थ शांत झाले. प्रत्येकाची बाजू ऐकून घेत त्यावर तोडगा काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
'राजकारण गरीब माणसांमध्ये आणू नका'
महाविकास आघाडीच्या काळात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी (Shiv bhojan Thali) बंद होण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यावर सुप्रिया सुळे मात्र संतापल्या. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना राजकारणच दिसतं. गरीब कष्टकरी लोकांसाठी ज्या योजना केल्या आहेत त्या कृपा करुन बंद करु नका. राजकारण गरीब माणसांमध्ये आणू नका अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.