(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे पालिका कर्मचाऱ्यांसाठी वेगळं कोविड रुग्णालय सुरु करा’, कामगार युनियनची मागणी
पुणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळं कोविड रुग्णालय ऊभारावं अशी मागणी पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनने (मान्यताप्राप्त) केली आहे.
पुणे : शहराच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या 13 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 सफाई कर्मचारी आहेत. पण दुर्दैव असं की पुणे शहराच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या या कर्मचाऱ्यांनाही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी वणवण भटकावं लागलं. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळं कोविड रुग्णालय ऊभारावं अशी मागणी पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनने (मान्यताप्राप्त) केली आहे.
पुणे महापालिकेचे 13 कर्मचारी कोरोनाने मृत्यूमुखी पडले. यामध्ये 11 सफाई कर्मचारी आहेत. यातील अनेक व्यक्ती घरातील एकमेव कमवती व्यक्ती होती. पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले 50 लाख आणि पुणे पालिकेने जाहीर केलेल्या 25 लाखांपैकी कोणतीच मदत त्यांना मिळालेली नाही. यामुळे आपल्या माणसाला गमावल्यानंतर आता परिस्थिती त्यांना हतबल बनवत आहे.
शकुंतला बालकृष्ण साळेकर याही सफाई कर्मचारी होत्या. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचा 8 महिन्यांच्या आधी अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे सुन, दोन नातवंड आणि तरुण मुलगीची जबाबदारी शकुंतला साळेकरांच्याच खांद्यावर आली. आपल्या कुटुंबाला चरितार्थ चालवण्यासाठी झटणाणाऱ्या शकुंतला साळेकरांना जेव्हा करोनाचा संसर्ग झाला तेव्हा मात्र त्यांना रुग्णालयात बेडही लवकर मिळाला नाही. त्यांच्या जाण्याने त्यांचं कुटूंबच उघड्यावर आलं आहे. पालिकेने आर्थिक मदत लवकर करावी तसंच एक वारसाला नोकरी देण्याचं वचन लवकरात लवकर पुर्ण करावं अशी मागणी शकुंतला साळेकर यांच्या सुनेनं केली आहे.
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळं रुग्णालय ऊभारण्याचा विचार नसल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. मात्र या मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं त्यांनी सांगितले.