Vijay Shivtare : माझ्या मनाला मुरड घालून मी माघार घेतली; सासवडच्या सभेपूर्वी शिवतारेंची कबुली
विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून मनाला मुरड घालून माघार घेतली असल्याची कबुली दिली आहे.
सासवड, पुणे : विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून मनाला मुरड घालून माघार घेतली असल्याची कबुली दिली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पालखीतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यापूर्वी शिवातरेंनी एबीपी माझाशी बोलताना हे विधान केलं आहे. लोकांच्या हितासाठी आणि महायुतीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतला असल्याचं विजय शिवतरे यांनी म्हटलं आहे.
विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे मी निवणजुकीतून माघार घेतली. निवडणुकीतून माघार घेण्याची माझी कोणतीही मानसिकत नव्हती. निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी झाली होती. कार्यकर्तेदेखील कामाला लागले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे मला माघार घ्यावी लागली. राज्यातील अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या अपक्ष उमेदवारांमुळे मतांची विभागणी होईल. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं महायुतीच्या नेत्यांना वाटत होतं. आपल्यामुळे महायुतीला आणि मुख्यमंत्र्य़ांना त्रास होऊ नये, यासाठी माघार घेतल्याचं ते म्हणाले.
'मागील पाच वर्ष वाया गेल्याचा आमचा राग आहे. पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. विमानतळ, बाजार, पुरंदरमधील आयटी हब अडकलं आहे. या आयटी हबमुळे अनेक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या मात्र ती कामं अडकली,असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच जेजुरीसाठी 100 कोटी मिळावेत, अशी मागणी केली होती. ही देखील पूर्ण झाली नाही. असे एकूण 13 मागण्या आहेत या मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आमचा राग असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं आहे.
फडणवीस का येणार नाहीत?
शिवतारे म्हणाले की, या सासवडच्या सभेला देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र नांदेडमध्ये अमित शहांची सभा आहे. त्यांनी राज्याच्या नेता म्हणबव तिकडे जावं लागणार आहे. त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं शिवतारेंनी सांगितलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीसाठी काम करणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला आम्ही लागलो आहे. येत्या निवडणुकीत त्यांनाच विजयी करु, असा विश्वास शिवातरेंनी व्यक्त केला आहे.