(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena : ...म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, श्रीरंग बारणेंनी खंत बोलून दाखवली
MP Shrirang Barne : महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवारांना सुटेल म्हणून खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेले का?
MP Shrirang Barne : महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवारांना सुटेल म्हणून खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेले का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण महाविकास आघाडीने मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवारांसाठी सोडावा, अशी राष्ट्रवादीने मागणी केली तेव्हा शिवसेनेनं विरोध केला नाही. अशी खंत शिंदे गटात दाखल होताच खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रवादी सोबत जुळलेलं सूत पाहता, पवार कुटुंबियांसाठी बारणेंचा बळी घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होतीच. तीच शक्यता अप्रत्यक्षपणे खासदार बारणेंनी आज पिंपरी चिंचवडमध्ये येताच बोलून दाखवली.
एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले खासदार श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत करण्यात आलं. समर्थकांनी बंगल्याजवळ गर्दी करत, श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दर्शवला. खासदारांच्या तुलनेत उपस्थितांची संख्या नक्कीच कमी होती. कारण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या स्वागतकडे पाठ फिरवली. गुरुवारी शहर शिवसेनेनं श्रीरंग बारणे यांविरोधात आंदोलन केलं आणि शेरेबाजी ही केली होती. उद्धव ठाकरेंचे समर्थक आक्रमक असल्याने बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रीरंग बारणे 'काय' म्हणाले?
महा विकास आघाडीने पार्थ पवारांसाठी मावळ लोकसभा मतदारसंघ सोडावा, अशी मागणी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तेव्हा शिवसेना पक्षाच्या एकाही नेत्याने उघडपणे विरोध केला नाही. विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्यानं भविष्यातही आम्ही हा मतदारसंघ कोणाला सोडणार नाही, अशी भूमिकाही घेतली नव्हती. ही मोठी खंत आहे. खरं तर भविष्याचा विचार केला असता इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. हे 2014 आणि 2019च्या लोकसभा निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं शिवसेनेनं भाजपसोबत युती करावी. हे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बाब घातली होती. मात्र आत्ता हे शक्य नसल्याचं सांगत, त्यांनी मला योग्य तो निर्णय घ्या. असं सूचित केल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.