(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Shinde-Thakre Marriage : काय सांगता? 'ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात'; जुन्नरमधील लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल
शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना दररोज रंगत आहे. मात्र ही फटकेबाजी सुरु असताना जुन्नर तालुक्यातील एका लग्नपत्रिकेने साऱ्या पुणे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे .
Pune Shinde-Thakre Marriage : सध्या दसरा मेळावा महाराष्ट्राच्या (Dasara Melava) राजकारणातील सर्वात चर्चेचा आहे. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे गटाकडून दोन दसरा मेळावे झाले. दोघांनीही राजकीय फटकेबाजी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा रोज सामना रंगत आहे. मात्र ही फटकेबाजी सुरु असताना जुन्नर तालुक्यातील एका लग्नपत्रिकेने साऱ्या पुणे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
जुन्नरच्या ठाकरे आणि शिंदे कुटुंबियात सोयरीक झाली आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात जाणार आहे. एकीकडे दसरा मेळाव्यात झालेल्या फटकेबाजी आणि विरोधी वक्तव्यांमुळे राजकीय चर्चा रंगत असताना दुसरीकडे मात्र सोयरीक होताना दिसते आहे.
जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह होणार आहे. त्यांच्याच लग्नाची चर्चा सध्या सगळीकडे रंगत आहे.
लग्नपत्रिका पाहून अनेकांच्या चेहर्यावर आनंद
दि. 8 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच उद्या हा होणार आहे. सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणात त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात शिंदे आणि ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांची चांगलीच करमणूक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये कलगीतुरा रंगलेला असतो. राज्यात या दोन्ही गटात कटुता निर्माण झालं असताना ही पत्रिका सध्या भाव खाऊन जात आहे.
आठ दिवसांपूर्वीच झाली सोयरीक
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार हा वाद कोर्टात रंगत होता. अखेर ठाकरे कुटुंबियांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली. आठ दिवसांआधीच दसरा मेळाव्याची तयारी सुरु झाली. मात्र त्याच दिवसात या ठाकरे आणि शिंदे कुटुंबात कांदेपोह्यांचा कार्यक्रम रंगत होता. जवळचं स्थळ आहे आणि चांगलं स्थळ आहे, असं सांगण्यात आलं आणि दोन्ही कुटुंबियांचं एकमत होत विवाह ठरला. आमचं लग्न ठरताना अशा प्रकारची प्रसिद्धी मिळेत असं वाटलं नव्हतं. मात्र त्यानंतर राजकीय वातावरण पाहून आणि मिळत असलेली प्रसिद्धी पाहून आनंद होत आहे, अशा भावना वर विशाल शिंदे यांनी व्यक्त केल्या आहे.
'शिंदे-ठाकरे राजकारणात देखील एकत्र यावेत'
ज्याप्रमाणे आम्ही सर्वसाधारण लोक शिंदे आणि ठाकरेंचं मनोमिलन करत आहोत, तसंच चित्र येत्या काळात महाराष्ट्रात बघायला मिळावं. शिंदे-ठाकरे राजकारणात देखील एकत्र यावेत, अशी इच्छा मुलाचे काका शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच खंडेराव विश्राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या-
Dasara Melava : कालच्या मेळाव्यांची आजही चर्चा! दसरा मेळाव्यात नेमकी कुणी मारली बाजी?