आयुष्यभर माझं नाव घ्या मला काहीच फरक पडत नाही, मोहोळांचा शेट्टींसह धंगेकरांवर हल्लाबोल, म्हणाले घोषणाबाजी करणारे लोक कोणीतरी सोडलेले
गेल्या 10 ते 12 दिवसात पुण्यात वेगळं राजकारण सुरू झालं आहे. जैन बांधवांनी जो मोर्चा, आंदोलन केलं त्यात माझं कधीही कुठलंही नाव घेतलं नाही असे मत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
Muralidhar Mohol : गेल्या 10 ते 12 दिवसात पुण्यात वेगळं राजकारण सुरू झालं आहे. जैन बांधवांनी जो मोर्चा, आंदोलन केलं त्यात माझं कधीही कुठलंही नाव घेतलं नाही असे मत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. राजू शेट्टी साहेबांनी माझं नाव घेतलं त्यांना राजकारण करायचं आहे. आयुष्यभर माझं नाव घ्या मला काही फरक पडत नाही असे मोहोळ म्हणाले. त्यांचं बघून पुण्यातले काही लोकं जागी झाली होती. काहीही बोलत होती, त्यांचा आणि या जैन समाजाचा काही संबंध नाही. लांबून लांबून काहीच संबंध नव्हता यांची गाडी कुठल्या कुठेच घसरली असेही मोहोळ म्हणाले.
ज्या लोकांनी घोषणाबाजी केली ती दोन लोक कुणीतरी सोडलेलीच होती
जैन मुनींनी मला आवाहन केलं होतं की, तुम्ही पुण्याचे खासदार आहात या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या सहभागी व्हा. यातून मार्ग काढून द्या, असं जैन मुनी यांनी मला आवाहन केलं होतं. माझा सहभाग असता तर त्या लोकांनी मला बोलवलं नसतं, असे मोहोळ म्हणाले. मी त्यांना शब्द दिला आहे की पुढच्या काही दिवसात मी यातून मार्ग काढून देईल. मी सगळ्यांशी बोलीन, ज्यांनी व्यवहार केला किंवा जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी बोलून मार्ग काढू असेही मोहोळ म्हणाले. ज्या लोकांनी घोषणाबाजी केली ती दोन लोक कुणीतरी सोडलेलीच होती. त्या लोकांनी तिथेही राजकारण केल्याचे मोहोळ म्हणाले.
काही विषय सोडून दिल्याने सुटत असतात, मोहोळांचा धंगेकरांना टोला
जे आरोप करतात त्यांचा विषयी मी आता सोडून दिला आहे. काही विषय सोडून दिल्याने सुटत असतात असे म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली. हा विषय माझ्यासाठी किरकोळ आहे. त्यांना काहीही ट्विट करु द्या असे धंगेकर म्हणाले.
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding House) जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मादी आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) हे मोहळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज मंत्री मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग होस्टेलमध्ये गेले होते. त्यांनी जैन गुरुचं दर्शन घेऊन चर्चा केली आहे. यानंतर मोहोळ यांना जैन समुदायाच्या नागरिकांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळालं. जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी नागरिांनी मोहोळ यांच्याकडे केली आहे.

























