Rohit Pawar : मोठी बातमी : सुप्रिया सुळेंविरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, आम्हीही लढू, रोहित पवार यांचं ओपन चॅलेंज
अजित पवारांनी बारामतीमध्ये केलेल्या भाषणात त्यांचा अहंकार दिसून येतोय अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत या भीतीने अजित पवार हे शरद पवारांवर टीका करतात असंही ते म्हणाले.
बीड: बारामती लोकसभेच्या निवडणुकीत (Baramati Lok Sabha Election) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला उभा करतील असा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. अजितदादांनी बारामतीमध्ये रविवारी जे भाषण केलं त्यामध्ये अहंकार दिसत होता असंही ते म्हणाले. रोहित पवारांच्या या दाव्यानंतर आता अजित पवारांसोबतचा त्यांच्या संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हं आहेत. बीडमध्ये एका कार्यक्रमानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला.
आम्हीही लढू, रोहित पवारांचं ओपन चॅलेंज
रोहित पवारांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार त्यांच्या कुटुंबातीलच एका व्यक्तीला तिकीट देतील आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीत उभं करतील. अजित पवार यांनी काल जे भाषण केले त्या भाषणामध्ये त्यांच्यातला अहंकार दिसत होता. त्यामुळे सत्तेमध्ये राहून अजित पवार हे स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला निवडून आणतील, मात्र आम्ही लोकांना विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीसोबत लढत राहू.
बीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कंकालेश्वर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी रोहित पवार बीडमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच बारामती लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. अजित पवार यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभा राहील, भाजपला पवार कुटुंबात फुट पडावी अशी भाजपची इच्छा असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आज बीडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कंकालेश्वर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच उद्घाटन करण्यात आलं.. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली तर ईडीच्या कारवाईला देखील घाबरत नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केल.
बारामती लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच बारामतीच्या लोकांनी आतापर्यंत वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐकावं असं आवाहनही अजित पवारांनी केलं होतं. बारामतीच्या लोकांनी विधानसभेला एक आणि लोकसभेला एक असं मतदान करू नये, दोन्हीवेळाही आपल्याला मतदान करावं असं आवाहन अजित पवारांनी केलं.
लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत ही अजित पवारांनी भीती
भाषणामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याची मला अपेक्षा नव्हती असं रोहित पवार म्हणाले. आम्ही ज्या दादांना ओळखतो ते दादा आता राहिलेले नाहीत, भाजपमध्ये जाऊन ते भाजपच्या विचारावर चालत आहेत. दिल्लीतले लोक खूश व्हावेत यासाठी ते शरद पवार यांच्यावर नेहमी टीका करतात, त्यांच्या वयाचा उल्लेख करतात. सत्तेमध्ये असलेल्या अजितदादा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, युवकांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगारी कशी संपवता येईल यासाठी त्यांनी लोकांना विश्वास दिला पाहिजे, मात्र लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत या भीतीने ते सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना देखील भाजपच्या व्हायरसची लागण झाल्याचे रोहित पवार म्हणाले.
ईडीच्या कारवाईवर बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, गरज नसतानाही सध्या ईडीच्या चौकशीला मला सामोरे जावे लागत आहे. निवडणुका जवळ आल्याने राजकीय द्वेषापोटी माझ्यावर ईडीची कारवाई केली जात आहे. माझ्यावर कारवाई करतील, मला अटक करतील. तरी देखील मी मैदान सोडणार नाही , माझे विचार सोडणार नाही.
ही बातमी वाचा: