Sharad Pawar On Rajya Sabha Election : महाविकास आघाडीची मतं कायम, निकालाने धक्का बसला नाही: शरद पवार
Sharad Pawar On Rajyasabha Election : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मते फुटली नसल्याचा दावा केला आहे.
Sharad Pawar On Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. या निकालाने धक्काही बसला नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे येथे शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना म्हटले की, मतांची संख्या पाहिली शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची मतं फुटली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना एक मत अतिरिक्त मिळाले, याची मला कल्पना असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. भाजपला आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार यांनी म्हटले.
राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारसाठी आवश्यक असणारे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे हे या मतांवरून स्पष्ट दिसून येत असल्याचे पवार यांनी म्हटले.
प्रफुल्ल पटेल यांना आलेले विरोधकांच्या गोटातून आलेले अतिरिक्त मत हे शिवसेनेला जाणारे नव्हते. ते मत फक्त राष्ट्रवादीकडे येणार होते. हे मत देणाऱ्या व्यक्तीने मला याची कल्पना दिली होती. विरोधकांच्या गोटात माझ्यासोबत काम केलेले काहीजण आहेत असेही पवार यांनी म्हटले.
भाजपने घेतलेली हरकत हा रडीचा डाव होता, असेही पवार यांनी म्हटले. यामुळे मतमोजणीसाठी चार तासांहून अधिक उशीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले. शिवसेनेकडे फारसे संख्याबळ नसतानाही त्यांनी ही जागा लढवली. उद्धव ठाकरे यांनी ही जोखीम स्वीकारली. त्यांच्याकडे असलेल्या मतांपेक्षा अधिक मते त्यांनी घेतली असल्याचे पवार यांनी सांगितले.