राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; पण, पिंपरीतील मनसेचे नगरसेवक मात्र महाआघाडीच्या मदतीला
मनसे प्रमुख राज ठाकरे हे राज्य सरकारवर हल्लाबोल करताना पहायला मिळतायेत तर पिंपरीतील मनसेचे नगरसेवक मात्र महाआघाडीच्या मदतीसाठी सरसावताना आज पहायला मिळाले.
पिंपरी चिंचवड : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थात महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल करतायेत. त्यांना कात्रीत धरायची एकही संधी ते सोडत नाहीत. अशात पिंपरी चिंचवडमधील मनसेचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष सचिन चिखले मात्र शिवसेनेच्या मदतीला धावलेत. निमित्त होतं सर्व साधारण सभेत जलपर्णी आंदोलनाचं. शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले जलपर्णी गळ्यात घालून सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. सुरक्षा रक्षकांनी तासभर त्यांना दारावरच रोखून धरलं, तेव्हा महाविकासआघाडीचे नगरसेवक मदतीला धावून गेले. मनसे नगरसेवक सचिन चिखले ही तिथं पोहचले आणि भोसलेंना आत सोडलं नाही तर सभा बंद पाडू असा दम चिखलेंनी भरला. याप्रसंगी सुरक्षा रक्षक आणि नगरसेवक भोसलेंमध्ये धक्काबुक्की झाली.
मनसे शिवसेनेच्या मदतीला
शहरातून गेलेल्या पवना नदीवर जलपर्णीने साम्राज्य गाजवलंय. परिणामी परिसरात दुर्गंधी आणि मच्छर पसरलेत, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. आधीच कोरोनाने नागरिक त्रस्त आहेत, त्यात नवं संकट नको. अशी परिस्थिती असताना जलपर्णी का हटवली जात नाही, ज्यांना काम दिलंय ते हलगर्जीपणा का करतायेत. याबाबतचा जाब विचारण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले जलपर्णी गळ्यात घालूनच महापालिकेत अवतरले. तर एक जलपर्णीचा हार संबंधित अधिकाऱ्याला घालण्याच्या विचाराने आले होते. आजच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि प्रशासनाला ते धारेवर धरणार होते. मात्र, तत्पूर्वीच भोसलेंना सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून रोखण्यात आलं. इतर सर्व नगरसेवक सभागृहात पोहचले, पण बराच वेळ गेला तरी आपल्या सहकाऱ्याला आत येऊन दिलं जात नाही. ही बाब महाविकासआघाडीमधील नगरसेवकांच्या लक्षात आली, मग ते प्रवेशद्वारावर आले. या सर्वांचे सुरक्षा रक्षकांशी वाद सुरू झाले. तेव्हा मनसेचे निवडून आलेले एकमेव नगरसेवक सचिन चिखले ही शिवसेना नगरसेवक भोसलेंच्या मदतीला पोहचले. भोसलेंना तातडीने आत सोडा असं चिखले म्हणाले, यावर महापौरांच्या सूचना असल्याने सोडता येणार नाही. असं सुरक्षा रक्षक म्हणाले, यावर शहरातील प्रश्न आहे ना? मग त्यावर सभागृहात आवाज उठवायचा नाही का? तुम्ही दादागिरी करू नका? एक तासापासून तुम्ही त्यांना कसं काय रोखून धरलं, ते नगरसेवक असताना अशी वागणूक का देताय, आता त्यांना लगेच आत सोडलं नाही तर सभागृह बंद पाडेन. अशी धमकीच चिखलेंनी दिली.
अतिरिक्त आयुक्तांच्या गळ्यात जलपर्णी घालण्याचा प्रयत्न
महाविकासआघाडी आणि मनसे नगरसेवकांची सुरक्षा रक्षकांशी शाब्दिक चकमक झाली. पण तरी ही नगरसेवक भोसलेंना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. मग अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे भोसलेंची समजूत काढायला आले. पण तोवर सहनशीलता संपलेल्या भोसलेंनी अतिरिक्त आयुक्तांच्या गळ्यात जलपर्णी घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांशी भोसलेंची झटापट झाली, भोसलेंनी तसाच सभागृहात प्रवेश करण्यासाठी जोर लावला. पण ते अपयशी ठरले. शेवटी काहीवेळाने वाद मिटला आणि जलपर्णीविना भोसलेंना सभागृहात पोहचावे लागले.
मनसे नगरसेवक महाविकास आघाडीच्या मदतीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला कोंडीत पकडतायेत. विविध प्रश्नांवरून सरकारचे वाभाडे काढतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार ही त्यांना जशास तसं उत्तरं देतायेत. विनामास्क वावरणाऱ्या राज ठाकरेंना तर सत्ताधाऱ्यांनी चहूबाजूंनी घेरलं. अशी परिस्थिती असताना पिंपरी चिंचवड महाविकासआघाडीच्या मदतीसाठी मनसेचे नगरसेवक धावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यावरून शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण ही आलंय.