Pune Bypoll election : उद्धव ठाकरेंंचा फोन अन् सचिन अहिर यांच्याकडून मनधरणी; आतातरी राहुल कलाटे उमेदवारी अर्ज मागे घेणार का?
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली आहे. निवडणूक अर्ज मागे घेणार, अशी अपेक्षा सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.
Pune Bypoll election : शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी राहुल कलाटे (Rahul kalate) यांची भेट घेतली आहे. राहुल कलाटे निवडणूक अर्ज मागे घेणार, अशी अपेक्षा सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे. महाविकास (Pune bypoll election) आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाना काटे यांना दिल्यानंतर शिवसेनेचे राहुल कलाटे यांंनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत.
राहुल कलाटे यांची भेट घेतल्यानंतर सचिन अहिर म्हणाले की, "राहुल कलाटे यांनी समजूत घालवण्यासाठी आलो आहे. अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना विनंती केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन आलो आहे. राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीत तुम्हाला चांगली संधी देऊ अशी विनंती केली आहे. पक्षप्रमुखांनी देखील त्यांना फोनवरुन विनंती केली आहे. अर्ज मागे घेण्याचा विचार करावा. शांत डोक्याने विचार करा आणि कळवा. ते अर्ज मागे घेतील अशी आमची अपेक्षा आहे."
"उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यासाठी राहुल कलाटे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यानंतर ते योग्य निर्णय घेतील. महाविकास आघाडीसोबत राहतील, अशी अपेक्षा आहे. आमच्यातील सहकारी कार्यकर्ता सातत्याने सोबत राहिलं पाहिजे, अशीही आमची अपेक्षा आहे. मागील दोन दिवस त्यांच्या उमेदवारीवर चर्चा सुरु होती. काल संजय राऊतांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र अजून फार उशीर झाला आहे, असं वाटत नाही. कालपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतील असं वाटत होतं मात्र त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने मी आलो आहे. मागच्या वेळी त्यांच्या सोबत अनेक घटकपक्ष होते. मागील काहीही पुनरावृत्ती होणार नाही, असं वाटत नाही," असं सचिन अहिर म्हणाले.
शिवसेनेला एक जागा लढू द्यायला हवी होती; सचिन अहिरांनी व्यक्त केली खंत
संपर्कप्रमुख म्हणून पक्षाने किमान एक जागा लढवायला हवी होती, असं वाटतं. मात्र महाविकास आघाडीच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. पोटनिवडणुकीच्या सगळ्या बैठकांना संजय राऊत, सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते. त्यावेळी शिवसेनेकडून राहुल कलाटे यांच्याच नावाची चर्चा झाली. पक्ष म्हणून शिवसेनेला उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही आग्रही होतो, अशी खंत सचिन अहिर यांनी बोलून दाखवली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तीन वाजेपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत वाट पाहूया, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधाला आहे. राहुल कलाटे त्यांच्या समर्थक आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.