Rahul Gandhi on Electoral Bonds : राजकारण साफ करत होता, तर निवडणूक रोख्यातील देणगीदारांची नावं का लपवली? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
पुण्यातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेतून राहुल गांधी भाजपवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले की, ही संविधान वाचण्यासाठी लढाई आहे.
पुणे : निवडणूक रोख्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणते की, निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर आहे, ती थांबवा आणि काय होतंय ते आम्हाला कळवा. आम्ही तारीख मागूनही आम्हाला दिली नाही. मोदीजी म्हणत होते राजकारण स्वच्छ करत आहे, तर तुम्ही देणगीदारांची नावे का लपवली? देणगीदारांची नावं बाहेर आल्यानंतर एक दिवस कळतं की एका कंपनीला हजारो कोटींचं कंत्राट मिळतं, त्यानंतर लगेचच ती कंपनी भाजपला पैसे देते. ईडी, सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर लगेच त्या कंपनीकडून पैसे भाजपला जातात. मोदींनी निवडणूक रोख्यातून भ्रष्टाचार केल्याचा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
मोदींकडून 22 उद्योगपतींचे 16 लाख रुपयांचे कर्ज माफ
पुण्यातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेतून राहुल गांधी भाजपवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले की, ही संविधान वाचण्यासाठी लढाई आहे. लोकांना जे अधिकार संविधानामुळे मिळाले आहेत. संविधान बदलले तर देशातील 20 ते 25 लोकांच्या हातात अधिकार जातील, असे ते म्हणाले. मोदींनी 22 उद्योगपतींचे 16 लाख रुपयांचे कर्ज माफ केल्याचे राहुल गांधी म्हणाले. एवढ्या पैशातून देशातील शेतकऱ्यांचे कर्ज 24 वर्षांसाठी माफ करता आले असते, मनरेगा 24 वर्षे या पैशातून चालवता आली असती, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा संपवून टाकू
त्यांनी सांगितले की मोदींनी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा वाढवतील म्हणून असे जाहीर करावे. काँग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा आम्ही संपवून टाकू, ही मर्यादा कृत्रिम आहे. देशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांची एकत्रित संख्या 73 टक्के आहे. मात्र, ते मागास आहेत. देशातील मिडीया या 73 टक्क्यांचे प्रश्न मांडत नाहीत. हाय कोर्टाच्या 650 न्यायाधिशांमधे 100 लोकही 73 टक्के असलेल्या मागासवर्गीयांपैकी नाहीत. बजेटमधील पैसे खर्च करण्यावर मोजक्या लोकांचा अधिकार आहे. मात्र, मीडिया हे न दाखवता अंबानीच्या घरातील लग्न दाखवतात, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करणार असून आर्थिक सर्वेक्षणही करणार असल्याचे राहुल म्हणाले. न्यायालय, मीडीया, आणि अधिकारीव र्गात मागासवर्गीय किती आहेत याची आम्ही पडताळणी करु, त्यानंतर भारताचे राजकारण बदलून जाईल, हे क्रांतिकारक पाऊल असेल,असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या