(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari On Pune Traffic : नितिन गडकरींकडून पुणेकरांना मिळणार गिफ्ट; वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अधिक उड्डाणपूल बांधणार
पुण्यात आता गर्दीच्या ठिकाणी आणि वाहतूक कोंडीच्या हॉट स्पॉटवर अनेक उड्डाणपूल बांधण्याची तयारी आहे आणि त्यासाठी डीपीआरदेखील तयार असल्याचं केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
Nitin Gadkari On Pune Traffic : मागील काही महिन्यांपासून पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐकणीवर आला आहे. अनेक पुणेकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. यावर महापालिकेने अनेक उपाययोजन सुरु केल्या मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याचं नाव घेत नाही आहे. मात्र याच पुण्यात आता गर्दीच्या ठिकाणी आणि वाहतूक कोंडीच्या हॉट स्पॉटवर अनेक उड्डाणपूल बांधण्याची तयारी आहे आणि त्यासाठी डीपीआरदेखील तयार असल्याचं केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत डॉ.(कर्नल) ए बालसुब्रमण्यम यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी ही माहिती दिली आहे.
गडकरी म्हणाले की पुणे-मुंबई रस्ता बनण्यापूर्वी जेट एअरवेजची दररोज नऊ उड्डाणे होती. आता मला वाटत नाही की एकही आहे, कारण रस्त्याचा प्रवास सुधारला आहे. त्यामुळे रस्ते नीट करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आमची कामं सुरु आहे, असंही ते म्हणाले. आम्ही नागपूर ते पुणे असा नवीन रस्ता बनवणार आहोत, ज्यासाठी फक्त सहा तासांचा प्रवास लागेल. दिल्ली ते मुंबई अजूनही सुरू असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे दिल्ली ते जयपूर, डेहराडून आणि हरिद्वार या प्रवासासाठी प्रत्येकी फक्त दोन तास लागतील. दिल्ली ते अमृतसर चार तास, दिल्ली ते श्रीनगर आठ तास आणि बेंगळुरू ते चेन्नई दोन तासात पार होणार आहे.
विद्यार्थ्यांनी राष्ट्राचा विचार करावा; नितिन गडकरी
गडकरींनी विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या व्यावसायिक करिअर किंवा उद्योजकतेच्या पलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देण्यास सांगितले. विद्यार्थी ज्या पदवीने सुसज्ज आहेत, ते जीवनात नक्कीच चांगले काम करतील. लोकांप्रती संवेदनशीलता आणि नम्रतेची वृत्ती त्यांना अधिक यशस्वी आणि देशाचे चांगले नागरिक बनवेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयोग केले गेले. मात्र पुण्यातील वाहतूक कोंडी जैसे थे च आहे.विविध पूल पाडण्यात आले त्यानंतर मेट्रो सुरु केली. शिवाय चांदणी चौकातील पूलही पाडण्यात आला. मात्र पुणेकरांना वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. शिवाय उपाययोजनांचा उपयोग कधी होणार किंवा त्यांची अंमलबजावणी कधी होणार आणि वाहतूक कोंडी कधी संपणार असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडला आहे.