(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune weather Update : पुणं तापलं! पुण्यात मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमान वाढण्याची शक्यता
पुण्यात मंगळवारी तापमानात लक्षणीय वाढ झाली असून शिवाजीनगर येथे मोसमातील सर्वाधिक 37.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.पुढील तीन दिवसांत शहरात 37 ते 38 अंशांचा उच्चांक राहण्याची शक्यता आहे.
पुणे : पुणेकरांना मागील काही दिवसांपासून (Pune Weather Update) उन्हाच्या झळा जाणवत आहे. त्यातच पुण्यात (Weather Forecast) मंगळवारी तापमानात लक्षणीय वाढ झाली असून शिवाजीनगर येथे मोसमातील सर्वाधिक 37.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसा आकाश निरभ्र राहिल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक होत असल्याने पुढील तीन दिवसांत शहरात 37 ते 38 अंशांचा उच्चांक राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी, 8 मार्चला शिवाजीनगर येथे 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु अवघ्या चार दिवसांत कमाल तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली. सर्वसाधारण पातळीच्या तुलनेत 12 मार्चला कमाल तापमान 2.1अंशांपेक्षा अधिक होते. त्याच वेळी सर्वात कमी 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुणे जिल्ह्यातील इतर भागात शिवाजीनगरपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. लवळे येथे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले. उर्वरित भागात अंदाजे 37अंश सेल्सिअस तापमान असते. किमान तापमानापेक्षा कमाल तापमानात दुपटीने वाढ झाल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. पुणे शहर आणि परिसरात सध्या आकाश निरभ्र आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा राज्यावर लक्षणीय परिणाम होत आहे. राज्यात वाऱ्यातूनही ओलावा मिळतो, त्यामुळे आर्द्रता वाढते. परिणामी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे, अशी माहिती आयएमडी पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.
विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा!
सध्या महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. आज राज्यात सर्वाधिक तापमान वाशिम येथे 39. 4 अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. तर मध्य महाराष्ट्रातही सोलापूर 39. 2 अंश सेल्सिअस, मालेगाव 38. 4 अंश सेल्सिअस, सांगली 38. 6 अंश सेल्सिअस येथे सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातलं वातावरण कसं असेल?
राज्यातील किमान तापमानात अजूनही चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. त्यामुळे सकाळी उकाडा आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत सोमवारी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ नोंदविण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-