पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक, बॅरिकेट्स तोडून कुलगुरुंच्या कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न; पोलीस धावले
इंजिनिअरिंग परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. मात्र, या निकालातील बऱ्याच निकालांमध्ये घोळ असल्याचे देखील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

पुणे : देशात दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (Pune university) विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी नेहमीच चर्चेत असते, त्याचप्रमाणे आता पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे (Pune) विद्यापीठ देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत येत आहेत. आज विद्यापाठातील मुख्य इमारतीच्या समोर येऊन विद्यार्थ्यांनी (Student) आक्रमकपणे आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने इंजीनियरिंगचे विद्यार्थी मुख्य इमारतीच्या समोर बसून आंदोलन करत असून आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत, कुलगुरुंनी येऊन आमची भेट घ्यावी, अशा घोषणाही देत आहेत. इंजिनिअरींगची पुनर्परीक्षा घ्यावी आणि कॅरी ऑनची प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
इंजिनिअरिंग परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. मात्र, या निकालातील बऱ्याच निकालांमध्ये घोळ असल्याचे देखील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या या आंदोलनात विद्यार्थी आक्रमक झाले असून बॅरिकेट्स तोडून ते विद्यापीठातील कुलगुरुंच्या कार्यालयाकडे जात असल्याचे दिसून आले. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडवले मात्र आपल्या मागण्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
केवळ एका विषयासाठी आमचं संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये, त्यामुळे आम्हाला कॅरी ऑन देण्यात यावा अशी मागणी करत विद्यापीठातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी इतरही विभागाचे सर्व विद्यार्थी एकत्र जमले असून हे आंदोलन अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुलगुरुंनी आम्हाला 10 मिनिटांचा वेळ दिला होता, 10 मिनिटांत ते आमच्यापर्यंत येणार होते. मात्र, ते आमच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी न आल्यामुळे आम्ही आतमध्ये शिरलो, असेही विद्यार्थ्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे एक शिष्ट मंडळ कुलगुरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी, विद्यापीठाच्यावतीने एका प्रतिनिधीसोबत विद्यार्थ्यांची चर्चा झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन दोन दिवसासाठी स्थगित करण्यात आलं आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दोन दिवसांचा वेळ मागण्यात आला होता. त्यानुसार, विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन दिवसासाठी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. त्यामुळे, पुढील 2 दिवसांनंतर आंदोलनाची दिशी ठरवली जाऊ शकते,
दरम्यान, कॅरी ऑनच्या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी आज सकाळपासून आंदोलन करत होते, त्यात निकालातही काही त्रुटी असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनावेळी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे, अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन होते.
























