SPPU Pune News: फी वाढ रद्द होण्याची शक्यता; पुणे विद्यापीठातील विद्यार्थांच्या आंदोलनाला यश
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरमसाठ वाढलेल्या शुल्कासह अन्य मागण्यांसंदर्भात विद्यार्थांच्या आंदोलनाला यश आलं. लेखी पत्र देत प्रशासानाने आंदोलन थांबवले आहे.
SPPU Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरमसाठ वाढलेल्या शुल्कासह अन्य मागण्यांसंदर्भात विद्यार्थी सलग 3 दिवसांपासून मुख्य इमारत इमारत आवारात भर पावसात बेमुदत घंटानाद आंदोलन करत होते. अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांना सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबवले.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने गेल्या 3 दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला काल (दि. 13) अखेर विद्यापीठ प्रशासनातर्फे प्र-कुलगुरू संजीव सोनवणे आणि कुलसचिव प्रफुल पवार यांनी भेट देऊन समितीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शुल्कवाढीसंदर्भात समितीशी चर्चा करून लवकरच शुल्कवाढ मागे घेऊ, असे लेखी अश्वासनात कळवले. तसेच अनिकेत कँटीन, झेरॉक्स सेंटर आणि इंटरनेट कॅफेचेही टेंडर काढत असून येत्या 10 दिवसात तेही सुरू करू, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थीहिताच्या प्रत्येक मुद्द्यावर विद्यापीठ प्रशासन सातत्याने विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीसोबत प्रत्येक महिन्यात सातत्याने चर्चा करेल आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आवर्जून काम करेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या?
पदव्युत्तर आणि पीएच.डी अभ्यासक्रमांची फी वाढ रद्द करावी. वसतिगृहांची फी वाढ रद्द करणे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संशोधन केंद्रांचे शुल्क विद्यापीठाच्या शुल्काशी समांतर असावे. विद्यार्थी संशोधकांसाठी वसतिगृह लवकरात लवकर सुरू करणे. पीएच.डी.साठी फेलोशिप पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थी संशोधक. अनिकेत कँटीन आणि झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे पूर्वीच्या ठिकाणी त्वरित सुरू करण्यात येईल, या मागण्या विद्यार्थांनी केल्या होत्या.
विद्यापीठाने लागू केलेल्या शुल्कवाढीबाबत विविध विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फी वाढीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, समितीकडून अद्याप कोणताही समाधानकारक निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यापीठाच्या या विचित्र कारभाराचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम होणार होता. मात्र अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे.