(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Trangender council : तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार; राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. 14 आणि 15 सप्टेंबरला तृतीय पंथीयांसाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे.
Pune Trangender council : तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. निवडणूक आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून संयुक्तरीत्या 14 आणि 15 सप्टेंबरला तृतीय पंथीयांसाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवसांच्या या परिषदेत वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरलेले तृतीयपंथी , त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थाचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि निवडणूक अधिकारी सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप मंगळवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे..
या परिषदेत ‘एलजीबीटीआयक्यू’चा अर्थ आणि फरक, व्यसायामध्ये यशस्वी झालेल्या तृतीयपंथीयांशी संवाद, तृतीयपंथीयांचे शिक्षण आणि रोजगार, आपल्या पाल्याचे तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या पालकांशी संवाद, तृतीयपंथीयांचे चित्रण आणि स्थान : भाषा-साहित्य-पत्रकारिता-चित्रपट, तृतीयपंथीयांचा निवारा आणि आरोग्य, तृतीयपंथीयांसाठी आम्ही काय करणार? या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जमीर कांबळे आणि पथक हे तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या कविता सादर करणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
परिषदेत तृतीयपंथीयांची वेगळी ओळख, त्यांच्या पालकांनी त्यांचा केलेला स्वीकार-अस्वीकार, त्यांचे आरोग्य, रोजगार, शिक्षण, निवारा या समस्यांचा मागोवा, या समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक तरतुदी करण्याची गरज आदी विषयांची चर्चा केली जाणार आहे. तृतीयपंथीयांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी केले आहे.
तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वच्छतागृह अन् महापालिकेत नोकरी
तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष प्रयत्न केले जात आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने जिल्हा न्यायालयात तृतीयपंथींयांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे. तृतीयपंथींयांच्या हक्क व अधिकाराबाबत जनजागृती व्हावी तसेच सामान्य नागरिकांमध्ये त्यांना स्वीकारण्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने कार्य सुरु आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) तृतीयपंथी व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून स्वीकारले आहे. त्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे. शहरात पाच हजारांपेक्षा अधिक तृतीपंथी आहेत. बहुतांश तृतीयपंथ्यांकडे नागरिक वेगळ्यान नजरेने पाहतात. दुसरीकडे त्यांना सन्माने जगता, वावरता यावं म्हणून महानगरपालिकेने तृतीयपंथीसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.