एबीपी माझाचा दणका! पुण्यात वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन, 'माझा'कडून करण्यात आला होता पर्दाफाश
एबीपी मााझाच्या दणक्यानंतर वाहनचालकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
पुणे : वाहतुकीचे नियम मोडले तर वाहतूक विभागाकडून (Traffic Police) दंड आकारला जाणं स्वाभाविक आहे. हा दंड ई-चलनद्वारे भरण्याची परवानगी असतानाही पुण्यात मात्र ओनली कॅशचा फंडा वापरला जातोय. पैसे नसतील तर दुकानात जावून स्कॅन करा आणि पैसे आणा असा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आलाय. या सगळ्यात दुकानदारांकडून आर्थिक लूट केली जातेय. दुकानदाराला हाताशी धरुन पुणे वाहतूक पोलीस लोकांकडून कसे पैसे उकळतात होते याचा एबीपी माझाने (ABP Sting Operation) पर्दाफाश केला. एबीपी मााझाच्या दणक्यानंतर वाहनचालकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
दंड वसुलच्या नावाखाली पुणे वाहतूक पोलीसच वाटमारी करत असल्याच एबीपी माझाने समोर आणले. एबीपी माझाने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दंड वसुलीच्या नावाखाली दुकानदाराच्या माध्यमातून वाहनचालकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक पोलिस कर्मचारी संग्राम लक्ष्मण पवार यांना तातडीने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केली. बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी संग्राम पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
एबीपी माझाच्या कॅमेरात सगळा प्रकार कैद
पुण्यातील कोथरूडमधील नळ स्टॉप चौकात वाहतूक पोलीसांकडून दंड वसूल करण्यासाठी चौकातील एका दुकानात दंडाची रक्कम गुगल पे करण्यास सांगण्यात येत होते. मात्र त्या दुकानात पैसे स्कॅन करण्यासाठी नागरिक गेले की दंडाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दुकानदार गुगल पे ने पाठवायला सांगत होता. जास्त पैसे का घेताय? असे लोकांनी विचारल्यावर जी एस टी आणि इतर टॅक्ससाठी हे अतिरिक्त पैसे घेतले जात होते अस उत्तर दुकानदाराकडून दिलं जात होतं. एका अर्थाने दुकानदाराला हाताशी धरुन पुणे वाहतूक पोलीसांनी लोकांकडून पैसे उकळण्यात येत होते. एबीपी माझाच्या कॅमेरात हा सगळा प्रकार कैद झालाय.
चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात वाहतूक पोलिसांकडून लूट
पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला असतानाच वाहतूक पोलिसांकडूनच अशा प्रकारे जर सर्वसामान्यांची लूट होत असेल तर कुणाला विचारावे. पालकमंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात जर पोलीस अशा प्रकारे सर्वसामान्य माणसांची लूट करत असतील तर शहरात इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल? अशी प्रतिक्रिया काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.
गृहमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे, शिवसेनेची मागणी
तर अशीच काहीशी भावना शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरगुडे यांनी देखील बोलून दाखवली. सर्वप्रथम वाहतूक पोलिसांचा हा चेहरा उघडा पाडल्याबद्दल त्यांनी एबीपी माझाचे आभार मानले. वाहतूक पोलीस वाहतूक नियमांचे काम न करता कोपऱ्यात उभे राहून अशा प्रकारे वसुली करतात हे नित्याचेच आहे. आता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे अशी मागणी थरकुडे यांनी केली.