Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
Baramati Assembly Constituency : युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले.
बारामती : सध्या बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Vidhan Sabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. बारामतीत पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात लढाई होत आहे. त्यातच युगेंद्र पवारांनी पैसे वाटल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर काल रात्री युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. मात्र तपासादरम्यान कुठलेही अवैध आर्थिक व्यवहार आढळून आले नाही. आता यावर श्रीनिवास पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानसाठी काही तास उरले आहे. काल प्रचारच्या तोफा थंडावल्या मात्र बारामती विधानसभा मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा अजूनही सुरु आहे. श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर बारामतीत एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले श्रीनिवास पवार?
याबाबत श्रीनिवास पवार म्हणाले की, रात्रीच्या सुमारास तीन-चार पोलीस आले होते, त्यांच्यासोबत पाच ते सहा सरकारी अधिकारी होते. रात्री शोरूम बंद असते, पण ते आले आणि त्यांनी चौकशी केली. पोलिसांनी म्हटले की आम्हाला इथे तपासणी करायची आहे. येथील तक्रार आमच्यापर्यंत आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तक्रार कुठून आली याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. शोरूमचे कर्मचारी त्यांना आत घेऊन गेले. त्यांनी संपूर्ण शोरूमची तपासणी केली. त्यांना काहीही सापडले नाही, त्यामुळे ते परत निघून गेले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. निवडणुकीत अशा प्रकारच्या घटना होत असतात, सत्तेत असल्यावर काहीही करता येते, असेदेखील श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
याबाबत निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे पैसै वाटप होत असल्याबाबत तक्रार आली होती. त्यानुसार आम्ही शरयू मोटर्स या ठिकाणी तपासणी केली होती. पण त्या ठिकाणी आम्हाला काहीही आढळून आले नाही, असे नावडकर यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या