Vinod Tawde: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
Vinod Tawde Cash in Virar Hotel: विनोद तावडे यांनी वाटण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा आरोप. गेल्या तीन तासांपासून विनोद तावडे हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत.
विरार: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या (BVA) कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेला मनोरीपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे (Vinod Tawde) आले होते. याठिकाणी भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक (Rajan Naik) आणि भाजपचे काही पदाधिकारी हजर होते. विनोद तावडे यांना पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आल्याचा आरोप बविआकडून करण्यात आला. विनोद तावडे हे हॉटेलमध्ये असताना हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बविआचे कार्यकर्ते याठिकाणी येऊन धडकले आणि त्यानंतर विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी क्षितिज ठाकूर आणि बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना अक्षरश: घेरले होते. विनोद तावडे हे गळ्याला हात लावून शपथ घेत होते. मी पैसे वाटले नाहीत, असे सांगत होते. मात्र, आक्रमक झालेले क्षितिज ठाकूर आणि बविआचे कार्यकर्ते काहीच ऐकायला तयार नव्हते. बविआचे कार्यकर्ते विनोद तावडे यांना तावातावाने अनेक प्रश्न विचारत होते. आम्ही आल्यावर तुम्ही लाईट बंद का केली, असे बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना विचारले. त्यानंतर क्षितिज ठाकूर यांनी त्याठिकाणी असणारी एक डायरी हातात घेतली आणि उंचावून दाखवली. या डायरीत 15 कोटी रुपयांच्या नोंदी असल्याचा आरोप बविआने केला. तसेच बविआच्या कार्यकर्त्यांनी येथून एक काळी बॅग आणि नोटांची काही बंडलं ताब्यात घेतली. हा सगळा प्रकार सुरु असताना विनोद तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यावेळी पोलिसांनी मध्ये पडत बविआच्या कार्यकर्त्यांना विनोद तावडे यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्या राड्यामुळे विनोद तावडे हे गेल्या अडीच तासांपासून विवांत हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून विनोद तावडे यांच्या गाडीची तपासणी केली. मात्र, त्यांच्या गाडीत काहीही सापडले नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, तावडेंची गाडी आम्हाला तपासून द्यावी, अशी मागणी बविआचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. यामुळे अजूनही विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा सुरु आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नेते आहेत. त्यांच्याबाबत हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता याप्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा