(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune School : पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय
Pune School : पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
पुणे : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचसोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. आता त्यात पुण्याचीही भर पडली असून पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात आज झालेल्या कोव्हिड आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अद्याप पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
१ ली ते ८ वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 4, 2022
आठवडाभरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मा. पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत झाला आहे. सदरील वर्गांना ऑनलाईन परवानगी असेल.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधल्या पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
राज्यातही गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. सहा दिवसांपूर्वी असलेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत काल रुग्णसंख्या तब्बल सहापटीनं वाढलीय. कोरोनाचा हा विस्फोट होत असताना राज्यात आणखी कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :