Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Savari Drugs Case : मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सावरी येथे छापेमारी करत तिघांना अटक केली होती. या प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

पुणे : मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील शेडवर छापा टाकत मेफेड्रोन जप्त केलं. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या नावावर असणाऱ्या हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा आरोप केला. यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. मात्र, सावरी ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात मुंबईतील मुलुंड येथील विजयनगरच्या गणेश कृपा बिल्डिंगच्या समोरील फूटपाथवरुन झाल्याचं समोर आलं आहे.
Savari Drugs Case : मुलुंडमध्ये ते सावरी व्हाया पुणे, पोलीस कसे पोहोचले?
मुंबई पोलिसांना 8 डिसेंबरला मुलुंडमधील विजय नगरमधील गणेश कृपा बिल्डिंगच्याच्या समोरील फूटपाथवर दोन इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळले . पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची नावं सलीम अब्दुल हमीद शेख वय 32 आणि रईस शेख वय 37 असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापैकी सलीम शेखकडे एक नायलॉनची पिशवी होती . त्या पिशवीत एक लिफाफा होता आणि लिफाफ्यात नोटबुक होती . त्या नोटबुकमध्ये आतील पानावर एक प्लॅस्टिकची पिशवी चिकटवण्यात आली होती . ती पिशवी उघडली असता त्यामध्ये 10 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आलं . त्याचबरोबर त्याच्या पँटच्या उजव्या खिशात सापडलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत 64 ग्रॅम मेफेड्रोन सापडले . तर रईस शेखच्या पँटच्या उजव्या खिशात 62 ग्रॅम मेफेड्रोन सापडले.
मुंबई पोलिसांनी त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी ते मेफेड्रोन पुण्यातील विशाल मोरेंकडून आणल्याचं सांगितलं. मुंबई पोलिसांनी विशाल मोरेला पकडण्यासाठी सापळा लावला. त्याला मेफेड्रोन खरेदी करायचे आहे असं सांगून 13 डिसेंबरला पुणे मुंबई हायवेला बोलावले आणि मेफेड्रोनसह अटक केली. विशाल मोरेने ते मेफेड्रोन सातारा जिल्ह्यातील सावरी गावात तयार होत असल्याचे सांगितले.
मुंबई पोलिसांचा सावरीत छापा, तिघांना अटक
मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापा टाकला असता गुरांच्या गोठयासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन तयार करण्यात येत असल्याचं आढळून आलं . पोलिसांनी तिथून अब्बास सय्यद उर्फ सद्दाम, वय 29 , राजिकूल रेहमान, वय 30 आणि हाबिजुल इस्लाम, वय 25 यांना अटक केली .
मुंबई पोलिसांनी ज्याच्या सांगण्यावरून सावरी गावात धाड टाकली तो विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे विद्यार्थी आघाडीचा शहरप्रमुख आहे. 3 डिसेंबरलाच त्याची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
सावरी गावातील ज्या शेडवर धाड टाकून तिघांना अटक करण्यात आली त्या तीन कामगारांना ओंकार डिगे नावाचा स्थानिक युवक जेवण आणून देत होता . ते जेवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या तेज यश या रिसॉर्टमधून दिले जात होते असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. मात्र, मुंबई पोलिसांनी काढलेल्या प्रेसनोटमध्ये ओंकार डिगे कडे चौकशी करण्यात आलेली असून त्याचा कोणताही सहभाग या प्रकरणात आढळून आलेला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाही, असा दावा केला आहे.























