Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Ravindra Dhangekar : शिवेसना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांना पुण्यातील भाजप शिवसेनेच्या जागावाटपाच्या चर्चेला बोलावण्यात आलं नव्हतं.

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील महायुतीची पहिली महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. मात्र या बैठकीतून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा 40 वर्षांचा गड हादरवणारे रवींद्र धंगेकर यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, खासदार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष गणेश बिडकर, तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, बापू शिवतरे, नाना भानगिरे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र, महायुतीतीलच एक प्रमुख चेहरा असलेल्या धंगेकरांना निमंत्रणच न मिळाल्याने ‘धंगेकर मुद्दाम डावलले का?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Ravindra Dhangekar : धंगेककरांची भाजपविरोधी भूमिका ठरली अडचणीची?
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदार बनलेल्या रवींद्र धंगेकरांनी नंतर लोकसभेत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्या पराभवानंतर सत्तेत नसल्यास कामे होत नाहीत अस सांगत त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र शिवसेनेत आल्यानंतरही त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर सातत्याने टीका सुरूच ठेवली. हाच आक्रमक पवित्रा आता त्यांना महागात पडत असल्याचे चित्र आहे.
भाजप नव्हे, शिवसेनेचाच ‘प्रॉब्लेम’?
या बैठकीबाबत भाजपकडून नाराजी नसल्याचे स्पष्ट करत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी थेट शिंदे सेनेकडेच बोट दाखवले. धंगेकरांना बैठकीचे निमंत्रण शिवसेनेनेच दिले नाही, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे धंगेकरांचा प्रश्न शिवसेनेलाच अडचणीचा असल्याचे सांगितल.
कुटुंबीयांची उमेदवारीची तयारी, युतीला विरोध?
धंगेकर यांच्या पत्नी आणि मुलगा दोघेही महापालिका निवडणुकीसाठी तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे गणेश बिडकर यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली जात असल्याने, महायुती झाली तर हे गणित बिघडेल, अशी धंगेकरांची भीती असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच १६५ जागांवर ठाम राहण्याची त्यांची भूमिका आणि महायुतीबाबतचा संकोच वारंवार समोर येत आहे.
याउलट शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे भाजपसोबत युतीसाठी आग्रही दिसत असून ३५ ते ४० जागांचा प्रस्ताव त्यांनी पुढे ठेवल्याच सांगितल जातंय. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
युती टिकवण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात
धंगेकरांना बैठकीपासून दूर ठेवल्याबाबत विचारले असता, शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी युती टिकवण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात, असे सूचक उत्तर दिले. एका अर्थाने, धंगेकरांच्या नाराजीपेक्षा भाजपची साथ अधिक महत्त्वाची असल्याचेच त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुन्हा ‘भाजप विरुद्ध धंगेकर’ संघर्ष?
या घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘भाजप विरुद्ध धंगेकर’ हा संघर्ष रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फरक इतकाच, की यावेळी धंगेकर ज्या पक्षात आहेत, तो पक्षच त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहील का, हा मोठा प्रश्न आहे.























