School : मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नववीपर्यंतच्या शाळा बंद, राज्यातील महाविद्यालयांबाबत दोन दिवसात निर्णय
पहिली ते नववीपर्यंतची शाळा आणि अकरावीचे वर्ग सध्या बंद करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील महाविद्यालयांबाबतचा निर्णय हा येत्या दोन दिवसात घेण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधल्या पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
राज्यातही गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. सहा दिवसांपूर्वी असलेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत काल रुग्णसंख्या तब्बल सहापटीनं वाढलीय. कोरोनाचा हा विस्फोट होत असताना राज्यात आणखी कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
मुंबईतील शाळा बंद
मुंबईतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी आहे. फक्त दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा विचार करता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा सुरू राहणार आहे. मंगळवारपासून ते 31 जानेवारीपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
ठाण्यातील पहिली ते नववी शाळा बंद
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आता प्रत्यक्षात आल्यासारखे वातावरण असून त्यावर उपाय करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उद्यापासून जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या सर्व माध्यमांच्या सर्व आस्थापनांच्या ऑफलाइन शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी अजूनही लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही त्यांनी तात्काळ आपले लसीकरण करून घ्यावे सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटेशनचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
