Swachh Survekshan : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेची बाजी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव
देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांनी सर्वोच्च कामगिरी केली आहे. सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
पुणे: गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारतर्फे (MoHUA) तर्फे देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ (Swachh Survekshan 2023) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नगरपरिषदांनी सलग दुसऱ्यांदा देशपातळीवर सर्वोच्च कामगिरी केली आहे. यामध्ये सासवड आणि लोणावळा नगरपरिषदांचा (Lonavla Municipal Councils) पहिल्या तीन क्रमांकांच्या पुरस्कारांमध्ये समावेश आहे.
सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेस एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला असून 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या नगरपरिषदांना गौरविण्यात येणार आहे.
माझी वसुंधरा 4.0 मध्ये राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट जिल्हा व सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी असा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर कामगिरीमध्ये सातत्य राखून जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षण क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आठ ते दहा शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरुर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत.
सासवड नगरपरिषदेने या स्पर्धेकरिता जय्यत तयारी केली होती. त्याअंतर्गत घनकचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया, 40 ते 50 टक्के सांडपाण्याचा पुर्नवापर, शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरात 18 ठिकाणी विविध शिल्पांची उभारणी, प्लॅस्टीकचा रस्त्यांच्या कामासाठी पुर्नवापर, बांधकाम व इतर साहित्यांची योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली असून टाकाऊ वस्तू पासून विविध शिल्प आकारलेले ‘वेस्ट टू वंडर पार्क’ आकारले आहे. शहराला थ्री स्टार व वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.
लोणावळा नगरपरिषदेनेही सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी पूर्ण कार्यक्षमतेने सुरू केला. घनकचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया, शहरातील 40 ते 50 सांडपाण्याचा पुर्नवापर, शहरात रिड्यूस, रियूज, रिसायकल (आरआरआर) केंद्राची स्थापना करुन 2 टन इतक्या वस्तू 1 हजार 100 पेक्षा जास्त लोकांकडून जमा केल्या व त्यातील 1.5 टन वस्तू गरजू लोकांना देण्यात आल्या.
गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातील लोणावळा, सासवड, बारामती आणि इंदापूर शहरांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले होते.
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा आणि सासवड नगरपरिषदेने विशेष मेहनत घेऊन नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्यामुळे तसेच नागरिकांना सहभागी करुन घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदाही आगामी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत.
ही बातमी वाचा: