ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
कर्नाटक राज्यातील हुबळी येथून भिवंडीला जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित विदेशी व्हिस्की, रम दारु जप्त केली.
ठाणे : महाराष्ट्र राज्यात दारू विक्रीला (Liquor) बंदी नसली तरी ड्राय डे दिवशी अनेक ठिकाणी मद्यविक्री केली जाते. विनापरवाना मद्यविक्री आणि बोगस, परराज्यातील बनावट दारू विक्रीच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. गोव्यातून दारू आणून महाराष्ट्रात विक्रीचे प्रकरणही उत्पादन शुल्क विभागाने समोर आणले होते. मात्र, आता चक्क एका नामांकित ब्रँडच्या नावाचा वापर करून मद्याची तस्करी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एशियन पेंटची वाहतुक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने शिळफाटा येथे जप्त केला. विभागाच्या पोलिसांनी (police) कंटेनर चालक पूनमा राम गोदारा याला अटकही केली आहे.
कर्नाटक राज्यातील हुबळी येथून भिवंडीला जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी व्हिस्की व रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा सुमारे 55 लाख 69 हजारांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक वैभव वैद्य यांनी दिली. मद्याने भरलेल्या या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चलनावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यामुळे, एका नामवंत ब्रँडनेमचा वापर करुन मद्यविक्री करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे.
दरम्यान, येणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभुमीवर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपअधिक्षक वैभव वैद्य यांनी दिला आहे. त्यामुळे, अवैध मद्यसाठा विक्री करणाऱ्यांचे धाबे या कारवाईने दणाणले आहेत.