ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मारकडवाडीचा बोर्ड झळकावत लक्ष वेधलं. आता, धुळे शहरातही ईव्हीएमविरोधात मशाल मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे.
धुळे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर विरोधकांकडून अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महायुतीचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन आजपासून विशेष अधिवेशनही सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी न करण्याचा निर्णय घेतला. तसेच, ईव्हीएमविरोधात (EVM) जनआंदोलन उभारणार असल्याचंही मविआ नेते म्हणाले. त्यानुसार, मविआच्या नेत्यांनी आज विधानसभा परिसरातही ईव्हीएमविरुद्ध आवाज उठवला. त्यातच, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मारकडवाडीचा बोर्ड झळकावत लक्ष वेधलं. आता, धुळे (Dhule) शहरातही ईव्हीएमविरोधात मशाल मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे.
माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गाव सध्या अनेकांच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मारकडवाडी गावात जाऊन भेट घेणार आहेत. येथील नागरिकांनी पुकारलेल्या बॅलोट पेपरवरील मतदान चळवळीला गती देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अनिल गोटे हेही आक्रमक झाले असून त्यांनी ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चाची तयारी केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका भाजपने EVM मध्ये छेडछाड करुन भ्रष्टाचार करुन निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन, महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यावर्षीचा मलिदा चारून जिंकल्या आहेत. यावर आता देशाचेच एकमत झाले आहे. त्यामुळे महायुतीला मिळालेले हे बहुमत नसून हे ईव्हीएम द्वारे मिळालेले राक्षसी बहुमत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. तसेच, ईव्हीएमविरोधात विराट मशाल मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
9 डिसेंबर रोजी मोर्चा
निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर धुळेकर नागरिक आमची भेट घेऊन आम्हाला सांगत आहे की आम्ही सर्वांनी तुम्हाला म्हणजे मशालीला मत दिले होते, आमचे मत गेले कुठे असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित करत आहे. म्हणून आम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी 9 डिसेंबर रोजी सायंकाळी धुळे शहरातून विशाल असा मशाल मोर्चा काढणार असून ईव्हीएम मशिनची प्रतिकात्मक अंतयात्रा देखील काढणार असल्याची माहिती अनिल गोटे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा
भगवद्गगीता घेऊन भाजप आमदाराची शपथ; काँग्रेस खासदार संतापल्या, संविधानाची करुन दिली आठवण