Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
Mumbai Porsche Car Accident : या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या तरुणाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. अपघात झाल्यानंतर एका तरुणीने गाडीच्या काचेतून एक बाटली बाहेर फेकल्याचं दिसून येतंय.
मुंबई : वांद्रे भागात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारने अनेक बाईक्सना धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. पार्किंगमध्ये असलेल्या या बाईक्सना या पोर्शे कारने धडक दिल्याने त्यात कोणीही जखमी झालं नाही. कार चालवणारा तरुण हा मुंबईतील बड्या उद्योगपतीचा 19 वर्षीय मुलगा असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्रुव नलिन गुप्ता असं त्याचं नाव असून गाडी चालवताना त्याने दारू प्यायलेली का याचा तपास सुरू आहे. त्याच्या सोबत असलेल्या तरुणीने अपघात झाल्यानंतर एक बाटली बाहेर फेकल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
अपघाताचा सीसीटीव्ही समोर
मुंबईतील वांद्रे भागात शनिवारी पहाटे 2:40 वाजता ही घटना घडली आहे. ध्रुव नलिन गुप्ता याच्यावर बेदरकारपणे पोर्श चालवून पार्क केलेल्या अनेक बाईक्सला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधू वासवानी चौकाजवळील पदपथावर अनेक दुचाकी उभ्या असताना भरधाव वेगाने येणाऱ्या या पोर्श कारने त्या दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
गाडी धडक दिल्यानंतर ते पाचही जण गाडीतून उतरताना दिसत आहेत. त्यानंतर लोक जमा होऊ लागल्यानंतर त्यातील तरुणी पुन्हा गाडीत बसते आणि काचेतून एक बाटली बाहेर फेकताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. ती दारूची बाटली होती का? पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला का? याचे उत्तर आता पोलिस तपासातून समोर येईल.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्या कारमध्ये चार पुरुष आणि एका महिलेसह पाच जण होते. ध्रुव गुप्ता याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आता त्याचाअहवाल आल्यानंतर नशेमध्ये असताना ही कार चालवली होती का? निष्काळजीपणामुळे ही घटना घडली का? यासह अनेक गोष्टींची उत्तरं मिळणार आहेत.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण काय आहे?
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकली गेली.
ही बातमी वाचा :