तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत तासगाव विधानसभा मतदारसंघातुन आर आर पाटील तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून प्रथमच आमदारकीची माळ गळ्यात घातली होती.
Rohit Babar and Suhas Babar : 15व्या विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी पार पडला. आज पहिल्या दिवशी एकूण 173 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विरोधी पक्षांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. दरम्यान, आज एक अनोखा योगायोग सुद्धा शपथविधीच्या कार्यक्रमात घडून आला. पंधराव्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार असणाऱ्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे रोहित पाटील आणि खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनामध्ये प्रवेश केला आणि 34 वर्षांपूर्वीचा योगायोग जुळून आला. स्वर्गीय आर आर पाटील यांचे रोहित पाटील चिरंजीव आहेत, तर स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर आहेत.
नव्वदीमध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण
आमदार रोहित पाटील आणि खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानसभेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला आणि नव्वदीमध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण अनेकांना झाली. 1990 मध्ये प्रथमच काँग्रेसकडून निवडून आल्यानंतर स्वर्गीय आर आर पाटील आणि अनिल बाबर यांनी एकत्रितपणे विधानसभेमध्ये प्रवेश केला होता आणि तब्बल 34 वर्षांनी तोच योग आज विधानसभेच्या प्रांगणामध्ये दिसून आला. 34 वर्षांपूर्वी आबा आणि अनिल बाबर यांनी एकत्रित एन्ट्री केल्यानंतर त्यांच्या मुलांनी सुद्धा आमदार म्हणून एकत्रित एन्ट्री केली. रोहित पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून निवडणूक लढवताना माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव केला. सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यामुळे दोघांचीही पहिलीच आमदारकीची टर्म आहे.
आबा आणि अनिल बाबरांचा विधानसभेला विजय
स्व. आर. आर. पाटील आबा व स्व. अनिलभाऊ बाबर यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तासगाव विधानसभा मतदारसंघातुन आर आर पाटील तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून प्रथमच आमदारकीची माळ गळ्यात घातली होती. आर आर आबा आणि अनिल बाबर यांनी 1990 साली एकत्रितच विधानभवनामध्ये प्रवेश केला होता. आज त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील व आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केला. या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आर आर पाटील आणि अनिल बाबर यांची जोडी पुन्हा एकत्र आल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवली.
इतर महत्वाच्या बातम्या