Pune Rain: पुणे जिल्ह्यात गुरूवारी अतिवृष्टीचे 7 बळी, अनेकांचे संसारही गेले वाहून, कोणत्या परिसरात घडल्या दुर्दैवी घटना?
Pune Rain: पुणे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण बेपत्ता आहेत.
Pune Rain: पुणे जिल्ह्यात (Pune Heavy Rain) गुरुवारी झालेल्या पावसात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण बेपत्ता आहेत. तीन युवकांचा डेक्कन भागात शॉक लागून मृत्यू झाला, एक जण कात्रज भागातून वाहणाऱ्या आंबील ओढ्यात वाहून गेला, एक जण मुठा नदीत वाहून गेला, एक जण इंद्रायणी नदीत बुडाला, तर ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकचा मृत्यू झाला आहे. तर लवासा मधे दोन बंगल्यांवर दरड कोसळून तीघेजण बेपत्ता झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain) 7 जणांचा मृत्यू झाला असून, वारजे भागातील नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील एकूण १५ जनावरे दगावली आहेत. तर, मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात तसेच लवासा येथे दरड कोसळली. डेक्कनमधील भिडे पूल परिसरातील झेड ब्रिजखाली पुलाची वाडी येथे मध्यरात्री साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेजण अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. हातगाडी घरी घेऊन जाताना ही दुर्घटना घडली. अभिषेक अजय घाणेकर (२५), आकाश विनायक माने (२१) आणि शिवा जिदबहादूर परिहार (१८, रा. पुलाची वाडी, डेक्कन) अशी मृतांची नावे आहेत. हेसाचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने या तिघांना विजेचा धक्का बसला अशी, माहिती पोलिसांनी दिली आहे.
ताम्हिणी घाटातील आदरवाडी गावात एका हॉटेलवर दरड कोसळून शिवाजी बहिरट (रा. मुळशी) यांचा मृत्यू झाला. कात्रज लेकटाऊन जवळ व अष्टभुजा येथे असे दोघे बुडाले. आपत्ती व्यवस्थापन विभागान पहाटेपासून उपस्थित राहू जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना संबंधितांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीचा आढावा घेतला आहे.
पुणे, पिंपरीतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
पुण्याला हवामान विभागाने शुक्रवारी आज (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टीचा इशारा (Pune Heavy Rain) दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा ही सूचना केल्या आहेत.