पिंपरी विधानसभेत 7 हजार बोगस मतदार? आमदार अण्णा बनसोडेंकडे रोख? या इच्छुक उमेदवाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Pimpri Assembly: पिंपरी विधानसभेत बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल सात हजार दुबार मतदारांची नावं अंतिम यादीत आहेत.
Pimpri Assembly: आगामी विधानसभेचं बिगुल वाजण्यापूर्वीच पिंपरी विधानसभेत बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल सात हजार दुबार मतदारांची नावं अंतिम यादीत आहेत. हे बोगस मतदार एखाद्या उमेदवारास विजयी सुद्धा करू शकतात. असा दावा स्थायी समितीच्या माजी सभापतीआणि विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सीमा सावळे (Seema Salve) यांनी केला आहे. त्यांचा रोख थेट सत्ताधारी आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे आहे.
सीमा सावळे (Seema Salve) या भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. मात्र पिंपरी विधानसभा अजित पवार गटाला सुटणार हे उघड असल्यानं त्या चिन्हाशिवाय प्रचार करताना दिसत आहेत. अशातच त्यांनी मतदार यादींची छाननी करत ही बाब उघडकीस आणलेली आहे. आता निवडणूक आयोगाने ही नावं हटवली नाहीत तर त्या थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
याबाबत एबीपी माझाशी बोलताना सीमा सावळे म्हणाल्या, एकाच व्यक्तीचे दोन ओळखपत्र आहेत. त्यांची यादी काल निवडणूक विभागाला दिली आहे. त्यांना सांगितलं आहे त्यांची नावे लवकरात लवकर डिलीट करावीत. काहीची नावे तीन वेळा देण्यात आलेली आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर डिलीट व्हावी असं आयोगाला म्हटलं आहे. मला या यादीमध्ये ७ हजार नावं सापडलं आहेत. या ७ हजार नावांमुळे निकाल बदलणार आहे. गेल्या वेळी भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये सुलभा उबाळे अवघ्या १२०० मतांनी पडल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या ५-१० मतांनी देखील उमेदवार पडले आहेत. ७ हजार ही फार मोठी संख्या आहे.
लोकांना एक-एक मत गोळा करावं लागतं. जो सत्तेमध्ये असतो तो बोगस मताने वारंवार निवडून येतो. यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नाही. ७ हजार हा फार मोठा आकडा आहे. त्यामुळे निकाल बदलला जाऊ शकतो. यामुळे माझा यावर आक्षेप आहे. आण्णा बनसोडे इथे आमदार आहेत, त्यांना आत्तापर्यंत हे लक्षात आलं नाही, माझ्या हे लक्षात आलं मग त्यांच्या हे लक्षात आलं नाही का? हे त्यांच्याच आशिर्वादाने होऊ शकतं असं म्हणत सीमा सावळे (Seema Salve) यांनी हल्लाबोल केला आहे.