Pune Rain Ekta Nagar Flood: पूर असो-नसो, पुण्याच्या एकता नगरमध्ये नेहमी पाणी का घुसतं? नेमकं काय आहे कारण?
Ekta Nagar Flood: पुण्याच्या एकता नगरमधील सोसायट्यांना दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा असा विळखा पडतो. पाणी वाढत जातं आणि इथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ प्रशासनावर येते.

पुणे- पुण्यातील एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे या वेळी देखील नदीचं पाणी शिरलं. पुण्यात इतर भागांमध्ये पूर परिस्थिती नसताना दरवर्षी याच भागातील सोसायट्यांमध्ये पाणी का शिरतं हा प्रश्न त्यामुळं उपस्थित झाला आहे. याचं कारण फसलेल्या नियोजनात दडलंय. कारण आधी या भागात बांधकामांना परवानगी देण्यात आली आणि नंतर या भागात पूररेषेची आखणी करण्यात आली. त्यामुळं आपण विकत घेतलेलं घर पूररेषेच्या आतमध्ये आहे हे लोकांना नंतर समजलं. आता इथल्या नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची घोषणा करण्यात आलीय. मात्र हजारो लोकांचं पुनर्वसन हे महापालिकेसमोरच मोठं आव्हान असणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा असा विळखा पडतो
पुण्याच्या एकता नगरमधील सोसायट्यांना दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा असा विळखा पडतो. पाणी वाढत जातं आणि इथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ प्रशासनावर येते. याच कारण इथल्या पंचवीस ते तीस सोसायट्या या पूर रेषेच्या आतमध्ये येतात. पण आपण पूर रेषेच्या आतमध्ये राह्तोय हे या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बऱ्याच उशिरा कळालं.
नव्वदच्या दशकापर्यंत ते पुण्याजवळच एक खेडेगाव होतं
एकतानगरचा हा परिसर आधी वडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचा भाग होता. नव्वदच्या दशकापर्यंत ते पुण्याजवळच एक खेडेगाव होतं. त्यावेळी ज्यांना पुण्यात घर घेणं शक्य नव्हतं अशासाठी वडगाव बुद्रुकमध्ये घर विकत घेण्याचा पर्याय होता. ती संधी ओळखून बिल्डरांनी वडगाव बुद्रुकमध्ये बांधकामं करण्याचा सपाटा लावला. त्यावेळच्या ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आशीर्वादाने ही बांधकाम उभी राहिली आणि लोक इथं राहायला आले. त्यानंतर 1997 साली वडगाव बुद्रुक ग्रामपंचायत पुणे महापालिकेत विलीन झाली आणि हा परिसर एकता नगर म्हणून ओळखला जाऊ लागला.
2011 मध्ये जलसंपदा विभागाने इथे पूररेषेची आखणी
खरं तर पुण्यातील मुठा नदीची पूर रेषा आखण्याचे आदेश एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये देण्यात आले होते. मात्र अनेक वर्ष जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीच पावलं उचलली नाहीत. मात्र या भागातील सोसायट्यांमध्ये दरवर्षी शिरणारे पाणी लक्षात घेऊन 2011 मध्ये जलसंपदा विभागाने इथे पूर रेषेची आखणी केली केली. तेव्हा एकता नगरच्या पंचवीस ते तीस सोसायट्या पूर रेषेच्या आतमध्ये उभारण्यात आल्याचं लक्षात आलं.
घरे विकत घेतली तेव्हा इथे ग्रामपंचायत होती
या एकता नगरमध्ये ही मुठा नदीची पूररेषा आहे. या पूररेषेच्या आतमध्ये इथल्या पंचवीस ते तीस सोसायट्या येतात. मात्र हा भाग पूर रेषेच्या आतमध्ये येतो याची माहिती इथल्या नागरिकांना घर विकत घेताना इथल्या नागरिकांना नव्हती. कारण नव्वदच्या दशकात लोकांनी इथे घरे विकत घेतली तेव्हा इथे ग्रामपंचायत होती. जलसंपदा विभागाच्या दिरंगाईमुळे पूर रेषेची आखणी इथे करण्यात आली नव्हती. 2011 साली जलसंपदा विभागाकडून इथे पूर रेषेची आखणी करण्यात आली. मात्र या पूर रेषेवरून जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात वाद झाला आणि 2016 ला नव्याने पूर रेषेची आखणी करण्यात आली. तरीही इथल्या अनेक सोसायट्या पूर रेषेच्या आतमध्येच येत असल्याचं स्पष्ट झालं. या परिस्थितीला फसलेले नियोजन कारणीभूत असल्याचं पर्यावरण अभ्यासकांचं म्हणणं आहे.
एकता नगर पुन्हा एकदा पाण्याच्या विळख्यात
2024ला या भागात पूर परिस्थिती ओढवल्याबद्दल जलसंपदा विभागावर टीका करण्यात आली तर महापालिकेतील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी तोडगा म्हणून इथल्या नागरीकांचं कायम स्वरूपी पुनर्वसन करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र गेल्या वर्षभरात काहीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत आणि एकता नगर पुन्हा एकदा पाण्याच्या विळख्यात अडकलंय.
इतक्या सगळ्या नागरिकांचं पुनर्वसन करणं हे पुणे महापालिकेसाठी सोपं नाही. पण मुळात ही वेळ का ओढवलीय याचा विचार करण्याची गरज आहे. चुकीच्या बांधकामांना परवानगी द्यायची आणि त्यानंतर तो भाग महापालिकेत समाविष्ठ करायचा हे प्रकार अजूनही सुरु आहेत. या एकता नगरच्या उदाहरणातून आतातरी अशा चुका टाळायाला हव्यात.
























