Pune News: प्रतिभावान महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची गरज: रुपाली चाकणकर
Pune News: प्रतिभावान महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची गरज आहे, असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. त्या पुण्यात बोलत होत्या.
Pune News: समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेअंतर्गत बाल लिंग गुणोत्तर कमी असलेल्या गावातील पदाधिकाऱ्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा इतिहास आपल्या पुणे जिल्ह्याला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रात गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, रोखण्यासाठी प्रयत्न करावे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी प्रत्येक गर्भवती महिलांची नोंदणी करावी. यासाठी सरपंच, पोलीस पाटील यांनी लक्ष द्यावे. ग्रामपंचायतीच्या मदतीने सूचना बॉक्स उपलब्ध करुन देण्यात यावे. गावात भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असेही त्या म्हणाल्या.
महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा,एकट्या महिला यांच्या समस्या याबाबत जनजागृती करण्यात येते. आयोग महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कार्य करते. त्याचप्रमाणे बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये मध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनानंतर बालविवाहाचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं चित्र आहे. गरिबी आणि इतर काही समस्यांमुळे बालविवाह करण्यात आले होते. राज्याच्या महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2019 मधील याच कालावधीच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबरपर्यंत राज्यातील बालविवाहांमध्ये 78.3% वाढ झाली आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी विविध योजना राबवण्याची गरज आहे.