Pune Rikshaw Library : प्रवास होणार वाचनीय! मोबाईलच्या जमान्यात पठ्ठ्याने थेट रिक्षातच सुरु केलं वाचनालय
राज्यातच नाही तर देशात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. हे लक्षात आल्यावर पुण्यातले रिक्षाचालक प्रशांत कांबळे यांनी रिक्षातच वाचनालय सुरु केलं आहे. त्यांच्या या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे.
Pune Rikshaw Library : पुणेकर आणि पुणेकरांच्या आयडिया जगात (Rikshaw) भारी असतात. तुम्ही आजपर्यंत अनेक रिक्षा पाहिल्या असतील. रिक्षाला छान सजवलेली पाहिलं असेल, वेगवेगळ्या रंगाचे पडदे असो किंवा रिक्षात विविध रंगांचं पेंटींग असो किंवा रिक्षातली आकर्षक आसन व्यवस्था पाहिली असेल. अगदी रिक्षातला डिजेपण पाहिला असेल. मात्र तुम्ही रिक्षातलं वाचनालय पाहिलं नसेल. पुण्यातील एका पठ्ठ्याने रिक्षात थेट वाचनालय सुरु केलं आहे. राज्यातच नाही तर देशात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. हे लक्षात आल्यावर पुण्यातले रिक्षाचालक प्रशांत कांबळे यांनी रिक्षातच वाचनालय सुरु केलं आहे. त्यांच्या या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे.
स्टोरी टेल, ऑ़डीओ बुक आणि सध्या मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळे कुठेही प्रवास करताना हमखास आपल्या हातात आपला फोन असतो. एक तर आपण त्यावर बोलत जात असतो किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत बसण्यात आपला वेळ घालवत असतो. प्रवासादरमान पुस्तकं वाचणारी मंडळी किती आहेत ? याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मोबाईलने सध्या अनेकांचं आयुष्यच बदललं आहे. त्यात वाचन म्हटलं की सगळ्यात जास्त कंटाळवाणं वाटतं. मात्र हे सगळं प्रशांत यांनी हेरलं आणि रिक्षातच वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
रिक्षात पुस्तकांचा कोपरा...
रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या पुण्यात मोठी आहे. काही अंतरावर असो किंवा लांबचा प्रवास असो पुणेकर रिक्षाला प्राधान्य देतात. त्यामुळे या प्रशांतने रिक्षाच्या एका कोपऱ्यात पुस्तकांचं छोटं कपाट तयार करुन घेतलं आहे. या लाकडी कपाटात अनेक प्रकारची आणि विविध भाषांची पुस्तकं ठेवली आहे. रिक्षात प्रवास करणारे पुणेकर आवर्जुन यातील एका पुस्तकाला निदान हात लावतात तर काही पुणेकर पुस्तक वाचत प्रवास करतात. पुणेकर किंवा प्रवासी पुस्तक वाचत दिसलं की समाधान वाटतं, असं प्रशांत सांगतात.
प्रशांत यांनाच वाचनाची आवड...
मुळात प्रशांत जरी रिक्षाचालक असले तरीही त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे रोज सकाळी घरातून निघताना ते एक पुस्तक घेऊन रोजच्या रिक्षाच्या फेऱ्या करत असत. दिवसभरात रिकामा वेळ मिळाला की ते पुस्तक वाचत. त्यानंतर आपण प्रवाशांनाही ही सोय उपलब्ध करुन दिली तर वाचन संस्कृती जपता येईल, अशी कल्पना सुचली आणि एका क्षणाचा विचार न करता त्यांनी रिक्षात वाचनालय सुरु केलं.