(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Air Bus Nitin Gadkari : ...तर लगेच पुण्यात हवेतील बस सुरु करु; नितीन गडकरी
हवेतील बस सुरु करण्यासाठी पुणे महापालिकेकडून आराखडा तयार करुन मला द्यावा. आम्ही हवेतील बस सुरु करु, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे.
Pune Air Bus Nitin Gadkari : हवेतील बस सुरु करण्यासाठी पुणे महापालिकेकडून आराखडा तयार करुन मला द्यावा. आम्ही हवेतील बस सुरु करु, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin gadkari) यांनी केली आहे. त्यासोबतचनपुण्यातील बहुप्रतिक्षित चांदणी चौकातील प्रकल्पासंदर्भातदेखील त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या महाराष्ट्र दिनाला म्हणजेच 1 मे ला या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असल्याचंही ते म्हणाले. नितिन गडकरींनी आज आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाची पुणेकर वाट बघत आहे. एकदा पाहणी करुन लगेच 1 मे रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासोबतच पुण्याच्या भोवतालचा रिंग रोड पूर्ण झाल्यास वाहतुक कोंडी सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नवले पुलाबाबत जेवढं करायच तेवढं केलं. वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड कॅमेरे लावले आहेत. नवीन डीपीआर करायला दिला आहे. पण हा सगळा हायवेचा प्रकल्पच 35 हजार कोटींचा आहे, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
पालखी मार्गाची पाहणी
महाराष्ट्रातील आळंदी आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - 165) हा 234 किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण 12 पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी या बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल, असंही ते म्हणाले.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57,200 व दोन्ही बाजूस मिळून 18,840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.