Ambadas Danve : लाचखोर अधिकारी अनिल रामोडच्या मुदतवाढीसाठी मंत्री विखेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते पत्र; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Ambadas Danve On Radhakrishna Vikhe Patil: विशेष म्हणजे, विखे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेलं पत्र देखील दानवे यांनी ट्वीट केले होते.
Ambadas Danve On Radhakrishna Vikhe Patil: पुणे (Pune) विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड (Anil ramod) लाच प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत असून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याबाबत ट्वीट करत मोठा आरोप केला आहे. अनिल रामोडेला आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने (CBI) रंगेहाथ पकडले होते आणि त्यानंतर त्याला निलंबित देखील करण्यात आले होते. मात्र याच अनिल रामोडेची पुण्याच्या विभागीय अतिरिक्त महसूल आयुक्त पदावरून बदली न करता एक वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली होती, असा आरोप दानवे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, विखे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेलं पत्र देखील दानवे यांनी ट्वीट केले होते.
काय म्हणाले दानवे?
दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "व्वा रे व्वा विखे पाटील!... पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा 8 लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे नाव समोर आले आहे, त्या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते. 1 जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, असे दानवे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
अनिल रामोडकडे हा पुण्याच्या अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त पदावर कार्यरत होता. वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी रामोडकडे होती. पण रामोड शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची लाच मागत असल्याचा आरोप आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रामोडने 10 लाख रुपयांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे, ही लाच स्विकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर रामोडचे पुण्यातील शासकीय निवासस्थान, बाणेर भागातील रुतुपर्ण सोसायटीतील फ्लॅट आणि नांदेड इथल्या घरी सीबीआय कडून छापेमारी करण्यात आली. यामध्ये रोक रखमेसह महत्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत. तर सीबीआयच्या कारवाईनंतर त्याला निलंबित देखील करण्यात आले आहे. तर याच अनिल रामोडला त्याच्या सध्याच्या पदावर एक वर्षे मुदतवाढ देण्याबाबत विखे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना शिफारसपत्र पाठवल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Pune : अनिल रामोड यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत CBI कडून तपास, सहा कोटींच्या रोकडसह कागदपत्रे जप्त