Junnar Leopard Attack : मामाच्या गावी आलेल्या 8 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला; थेट पोटच फाडलं!
मामाच्या घरी यात्रेसाठी आलेल्या एका आठ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काळवाडी (जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात ही घटना घडली आहे.

जुन्नर, पुणे : पुणे आणि जुन्नरमध्ये (Junnar leopard Attack) सध्या बिबट्यांच्या (Leopard Attack) हल्ल्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. एका महिन्यात एकाचा तरी बिबट्याच्या हल्ल्यात जीव जातोय. आता मामाच्या घरी यात्रेसाठी आलेल्या एका आठ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काळवाडी (जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात ही घटना घडली आहे. रुद्र महेश फापाळे असं मृत्यू झालेल्या आठ वर्षीय मुलाचं नाव आहे.
मुळचे बेलापूरचे असलेले फापले हे आपले नातेवाईक रोहिदास गेनभाऊ काकडे यांना भेटण्यासाठी कालवाडीयेथे यात्रेसाठी गेले होते. काल रुद्रची आई आपल्या गावी परतली आणि आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याने त्याची आई भाग्यश्री फापले यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. फापळे यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.सकाळी साडेआठच्या सुमारास रुद्र घराबाहेर खेळत होता. घराशेजारील जनावरांजवळ येताच बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला पकडले. शेजारच्या उसाच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचे हल्ले थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि वन विभागाने या प्रश्नाकडे पूर्ण लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
.
जुन्रमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. शिवाय शेतकरी वनविभागात काम करत होते. मात्र, बिबट्याने लोकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. पाळीव प्राण्यांना सोडून आता बिबटे माणसांवर आणि लहान मुलांवर हल्ले करताना दिसत आहे. यावर तात्काळ आणि कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा भागात शासनाकडून मुलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी ही नाराजी व्यक्त केली.
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या काळात यावर काहीतरी उपाययोजना होण्याची जुन्नरकरांना प्रतिक्षा आहे.
इतर महत्वाची बातमी-























