(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Girish Bapat Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच? महाविकास आघाडीकडून तीन नावांची जोरदार चर्चा
खासदार गिरीश बापट यांच्या निधनांनतर रिक्त जागी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
Girish Bapat Bypoll Election : खासदार गिरीश बापट यांच्या (Girish Bapat) निधनांनतर रिक्त जागी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडून या पोटनिवडणुकीसाठीची तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीकडून सध्या तीन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने योग्य उमेदवाराची निवड करुन कसब्यात विक्रमी विजय मिळवला. त्यात रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यानंतर कसब्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. आता गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोणता योग्य उमेदवार निवडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं असलं तरी देखील भाजपकडून उमेदवारी कोणाला दिली जाते हे पाहूनच महाविकास आघाडी आपला उमेदवार निश्चित करतील. लवकरच पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात येईल असं बोललं जात असताना दोन्ही पक्षाकडून उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीकडून उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याची चिन्ह आहे. त्यासाठी तीन नावांची चर्चा आहे. कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा सुरु आहे. आतापर्यंतच्या निवडणुकींचा इतिहास पाहिला तर भाजपचा उमेदवार बघूनच महाविकास आघाडी किंवा विरोधात असलेला पक्ष उमेदवाराची घोषणा करतात. त्यामुळे ब्राह्मणांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीदेखील त्याच पट्टीच्या नेत्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
भाजपकडून पाच नावांची चर्चा...
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देणार मात्र या पाचही जणांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रोजक्ट्स हाती घेतले आहेत.
... तर निवडणूक बिनविरोध होणार?
पोटनिवडणूक जाहीर झाली तर बापटांच्या कुटुंबियांमधील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. मात्र गौरव हे राजकारणात फार सक्रिय नाहीत त्यामुळे स्वरदा यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. बापटांच्या घरी उमेदवारी दिली तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असा अंदाज आहे.