(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील जम्बो हॉस्पिटलची डेडलाईन हुकली; पाऊस आणि तांत्रिक बाबींमुळे विलंब
सध्या पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर एक आणि पिंपरी चिंचवडच्या अण्णासाहेब मगर मैदानावर एक अशा दोन जंबो हॉस्पिटलचं काम सुरु आहे.
पुणे : पुण्याने कोरोना रुग्णांच्या बाबतीत मुंबईलाही मागं टाकलंय आणि कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत तर पुण्याने संपूर्ण देशात आघाडी घेतलीय . पुण्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढतोय. मात्र एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील पुण्यातील दोन जंबो हॉस्पिटल्स वेळेत सुरु होतील अशी चिन्हे नाहीत. ही जंबो हॉस्पिटल्स 19 ऑगस्टला सुरू होतील असं सांगण्यात आलं होतं. परंतु पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरची सध्याची परिस्थिती पाहता आणखी काही दिवस त्यासाठी लागणार आहेत .
सध्या पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर एक आणि पिंपरी चिंचवडच्या अण्णासाहेब मगर मैदानावर एक अशा दोन जंबो हॉस्पिटलचं काम सुरु आहे. त्यासाठी दिल्लीतील एका कंपनीला कंत्राट देण्यात आलंय. त्यासाठी आवश्यक ती मदत पी एम आर डी ए करणार आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पावसामुळं जिथं ही जंबो हॉस्पिटल्स उभारायची आहेत तिथं सगळीकडे चिखल आणि पाणी साठल्याच दिसून येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना 30 जुलैला पुण्यातील अधिकाऱ्यांना तीन जम्बो हॉस्पिटल्स पुढच्या आठ दिवसांमध्ये सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु पुढे ही हॉस्पिटल्स सुरू करण्यासाठी एकवीस दिवस लागतील असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आणि त्यासाठी 19 ऑगस्ट ची तारीख नक्की करण्यात आली . त्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर कामही सुरू झालं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मधल्या काळात या मैदानाची पाहणी देखील केली परंतु 19 ऑगस्टला अवघा एक दिवस उरलेला असताना या मैदानावरचं चित्र हे असं आहे.
तर पिंपरी-चिंचवडमधील अण्णासाहेब मगर मैदानावरती उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती देखील फारशी वेगळी नाही. तर पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावरती उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या जम्बो हॉस्पिटलची योजना तर बारगळलीच आहे . गरज पडली तर तिसरं हॉस्पिटल सुरु करु असं प्रशासनाकडून सांगण्यात आलय.
पुण्यातील शासकीय महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या या जम्बो हॉस्पिटलमध्ये सहाशे आयसीयू बेडची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यापैकी चारशे बेड हे ऑक्सिजनची सुविधा असणारे असतील तर 200 बेड हे व्हेंटिलेटरची सुविधा असणारे असणार आहेत. या एका जंबो हॉस्पिटलसाठी 85 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि ही जंबो हॉस्पिटल पुढची सहा महिने कार्यरत राहतील.परंतु मुद्दा हा आहे की, पुणेकरांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हा ती का उपलब्ध होत नाहीयेत.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज या जम्बो हॉस्पिटल्सच्या कामाची पाहणी केली आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हॉस्पिटल्स उभारण्यास वेळ लागत असल्याचं म्हटलं . त्याचबरोबर 21 ऑगस्टपर्यंत हे जम्बो हॉस्पिटल सुरु होईल असा दावा केला. दुसरीकडे पुण्याने कोरोना रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आघाडी घेतली आहे .
सध्याच्या घडीला पुण्यातील कोरोनाच्या ॲक्टिव रुग्णांची संख्या 41,000 आहे. जी देशात सर्वाधिक आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येमध्ये देशाची राजधानी दिल्ली नंतर पुणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. दिल्लीत आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळलेत तर पुण्यात आत्तापर्यंत एक लाख तीस हजार करोना रुग्णांची नोंद झालीय. पुण्याने याबाबतीत 1,28,000 कोरोना रुग्णांची नोंद असलेल्या मुंबईलाही मागे टाकलय. त्यामुळे आत्ताच्या घडीला देशातील कोणाचा हॉटस्पॉट हा पुण्यात आहे हे स्पष्ट आहे. अशा परिस्थतीत जंबो हॉस्पिटल्स उभारण्यास होणार विलंब पुणेकरांसाठी आणखीनच जीवघेणा ठरतोय.
संबंधित बातम्या :
पुण्याची हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं वाटचाल, मात्र पुणे शहरात देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण