Good News : पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु लवकरच सुरु होण्याची शक्यता, जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक
Vande Bharat Express : पुणे आणि हुबळी दरम्यान येणाऱ्या काळात वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे मार्गावर पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावताना पाहायला मिळेल.
पुणे : पुण्यातून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे आणि नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसला 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती आहे. याशिवाय पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. पुणे-मिरज-हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय झालेला नाही मात्र याबाबतची माहिती समोर आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरुन धावणारी ही पहिली वंदे भारत एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस ठरणार आहे. कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी होत असताना आता त्याअगोदर पुणे-मिरज-हुबळी ही एक्स्प्रेस सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही एक्स्प्रेस सुरु झाल्यास मिरजपासून पुणे आणि हुबळी चार तासांच्या अंतरावर येणार आहे.
पुणे-मिरज- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या स्थानकांवर थांबणार?
पुण्याहून हुबळीसाठी सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड या स्थानकांवर थांबेल.पुणे आणि हुबळी या दोन्ही शहरांमधील अंतर 558 किलोमीटर आहे. पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला 8 कोच असतील.
पुणे-मिरज-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचं वेळापत्रक
हुबळीतून पुण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे पाच वाजता सुटेल. त्यानंतर पहिलं स्थानक धारवाड असेल. धारवाडला ती 5.15 पोहोचेल. तिथून 5.17 वाजता सुटेल. बेळगावला स्थानकावर ही एक्स्प्रेस 6.55 वाजता पोहोचेल. तिथं पाच मिनिटांचा थांबा असेल. बेळगावहून ही एक्स्प्रेस मिरजसाठी 7 वाजता पोहोचेल. मिरजला ही एक्स्प्रेस 9.15 वाजता पोहोचेल. मिरज स्थानकावर 5 मिनिटं थांबल्यानंतर ती पुढे रवाना होईल. सांगलीत ही गाडी 9.30 मिनिटांनी पोहोचेल. या ठिकाणी दोन मिनिटांचा थांबा असेल. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानकात ही गाडी 10.35 वाजता पोहोचेल. या ठिकाणी देखील दोन मिनिटं एक्स्प्रेस थांबेल. त्यानंतर ती पुढे पुणे जंक्शन येथे दुपारी दीड वाजता पोहोचेल.
पुण्याहून हुबळीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 2.15 वाजता सुटेल. साताऱ्यात ती 4 वाजून 8 मिनिटांनी पोहोचेल. सांगलीत 6.10 वाजता, मिरजला, 18.45 वाजता पोहोचेल. बेळगावला 8 वाजून 35 मिनिटांनी तर धारवाडला 10. 20 वाजता पोहोचेल. हुबळीत ही वंदे भारत एक्स्प्रेस 22.45 वाजता पोहोचेल. पुणे हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवासाचा वेळ साडे आठ तास आहे. या एक्स्प्रेसचा सरासरी वेग 65 किमी असेल.
दरम्यान, पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार यासंदर्भातील अधिकृत निर्णय अद्याप रेल्वेनं जाहीर केलेला नाही. मात्र, या एक्स्प्रेसचं वेळापत्रक समोर आलं आहे. ही रेल्वे सुरु झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
⚜️🍁⚜️ Congratulations.....😍🥳 1st Vande Bharat AC SF Express soon to be running on #Pune #Miraj #Hubli Line.
— Miraj Railway users (@Miraj_Jn_users) September 8, 2024
🔸️SWR gets Tr no 20669 Hubli Pune Vandebharat via #Miraj.
🔸️Fastest train with convenient timings from Miraj to Pune/Hubli (4hrs each).#Sangli #Kolhapur #Belagavi pic.twitter.com/D15CbqTbPg
इतर बातम्या :