पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?
पाण्यातून वाहणारी ही बस अन पाण्यावर तरंगणाऱ्या दुचाकी पाहून तुम्हाला वाटेल, की हे कोणतं तरी वॉटर पार्क आहे.

पुणे : जगाच्या नकाशावर आयटी पार्क (IT park) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील (pune) हिंजवडीला आता वॉटर पार्क म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. मात्र, ही अशी नको ती ओळख निर्माण करुन देण्याला प्रशासनच जबाबदार आहे. त्यांच्या भोंगळ काराभरामुळेच काही मिनिटांच्या पावसात (Rain) हिंजवडी बुडून जात आहे. त्यामुळं इथं वाहन रस्त्यावरून धावतात की पाण्यातून वाहतात, असा प्रश्च सर्वसामान्यांसह आयटीईन्सना ही पडतो. विशेष म्हणजे पुण्याच्या याच आयटी पार्कमध्ये तब्बल 4 ते 5 लाख कर्मचाऱ्यांसह त्यांच्यावर विसंबून इतरही रोजगार आहेत. त्यामुळे, सरकार, प्रशासन या करदात्या नागरिकांची, नोकरदारांची काळजी घेणार आहे का? हिंजवडीची होऊ घातलेली नवी ओळख पुसण्यासाठी पुढाकार घेणार आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पाण्यातून वाहणारी ही बस अन पाण्यावर तरंगणाऱ्या दुचाकी पाहून तुम्हाला वाटेल, की हे कोणतं तरी वॉटर पार्क आहे. पण, फार तर्क बांधण्याआधी थोडं थांबा. कारण हे कोणतं वॉटर पार्क नाही तर हे जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखलं जाणारं हिंजवडी आहे. आता तुम्हाला विश्वास बसत नसला तरी आता हिंजवडीला वॉटर पार्क अशी नवी ओळख मिळाली आहे. ही नवी ओळख निर्माण करुन देण्यात दुसरं-तिसरं कोणी नव्हे तर प्रशासन जबाबदार ठरलंय. आयटीयन्सनी मात्र याचा चांगलाच धसका घेतलाय. हिंजवडी अन माण गावात आयटी पार्कचे टप्पे उभारताना नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम झालं. नाल्यांमध्ये राडारोडा टाकल्याने ते बुजले, ड्रेनेज लाईनची खोली कमी झाली, मेट्रोच्या दोन पिलरमध्ये डिव्हायडर टाकल्याने पाण्याचा प्रवाहही अडला असे एकणानेक कारणं आहेत. ज्याकडे हिंजवडी एमआयडीसी अन् पीएमआरडीए सोईस्करपणे कानाडोळा करत आली, असा स्थानिकांचा आरोप आहे. हिंजवडीत छोट्या-मोठ्या 270 कंपन्या आहेत, त्यात रोज 4 ते 5 लाख कर्मचारी ये जा करतात. ऐन पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जात असल्यानं, या सर्वांना किमान 2 ते 3 तास अधिकचा वेळ प्रवासात खर्ची घालावा लागत आहे.
जर आयटी कंपन्याकडून 1 लाख 80 हजार कोटी रुपयांचा कर मिळत असेल अन् त्या बदल्यात सरकार आम्हाला मूलभूत गरजा पुरवू शकत नसेल तर ही शोकांतिका नाही का? अन् समस्या सुटत नसेल तर कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमचे धोरण अंमलात आणणार का? असा प्रश्न आयटी अभियंत्यांच्या संघटनांनी उपस्थित केलाय.
सरकारला भरमसाठ कर मिळतो, पण...
आयटी पार्क हिंजवडीने जगाच्या नकाशावर देशाला एक ओळख निर्माण करुन दिली. या आयटी कंपन्यांमुळं सरकारला भरमसाठ करही मिळतोय. पण त्याचं आयटी पार्कचं आपलं प्रशासन असं वॉटर पार्क करु पाहतंय हे दुर्दैवी आणि अनाकलयीन आहे. ही परिस्थिती वेळीचं हाताळली नाही तर भविष्यात इथल्या कंपन्या स्थलांतरित होतील अन् भावी पिढीचं उज्वल भविष्य पाण्यात घालण्यात आपणचं जबाबदार असू, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नक्कीच भासणार नाही.























