पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
घरासमोरील चेंबरचे झाकण तोडल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून निवृत्त पोलीस निरीक्षकाला ही मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे : राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे (Pune) शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ड्रग्ज प्रकरण, कोयता गँग, स्थानिक गुंडांच्या टोळ्या आणि अत्याचाराच्या घटनांनी पुणे शहर हादरुन गेल्याचं आपण पाहिलं आहे. त्यातच, काल भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर काही युवकांनी पोलिसांच्या (Police) गाड्यांवर चढून धिंगाणा केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातच, आता पुण्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून गुंडांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरातील फॉरेस्ट पार्कमधील ही घटना असून याप्रकरणी विमानतळ नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घरासमोरील चेंबरचे झाकण तोडल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून निवृत्त पोलीस निरीक्षकाला ही मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गोरखनाथ एकनाथ शिर्के असे मारहाण झालेल्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. फॉरेस्ट पार्क परिसरातील झाकण तुटल्याच्या संशयावरून राजू शंकर देवकर आणि गोविंद कॅनल या दोघांसह येरवडा परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांसह त्यांच्या कुटुंबांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. देवकर यांनी येरवडा परिसरातील काही गुंडांना बोलवून पोलीस निवृत उपनिरीक्षकांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिर्के यांच्या फिर्यादीवरुन 10 ते 12 जणांवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अधिक तपास पोलीस करत आहेत, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
राजू देवकर आणि गोविंद कॅनल या दोघांसह 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी शिर्के यांच्या घरात घुसून धुडगूस घातल्याचे पाहायला मिळाले. येरवाडा परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याला बोलावून त्यांना मारहाण करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याशिवाय पोलीस खात्यातील जुन्या सहकाऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
























