Pune Shivsena Ramesh Konde: पुणे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे शिंदे गटात सामील होणार; पुण्यात शिवसेना खिळखिळी
शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे हे शिंदे गटात सामील होणार आहेत. एकनाथ शिंदेंसोंबत जाणार असल्याच रमेश कोंडे यांनी जाहीर केलं आहे.
Pune Shivsena Ramesh Konde: शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे हे शिंदे गटात सामील होणार आहेत. एकनाथ शिंदेंसोंबत जाणार असल्याच रमेश कोंडे यांनी जाहीर केलं आहे. पुण्यातील महत्वाचे नेते शिंदे गटात सामील होत असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात उठाव केला होता. मात्र पुण्यात किंवा जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही आहे. त्यामुळे या उठावाचा पुण्यातील शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नसल्याचं चित्र होतं मात्र आता पुण्यातील शिवसेनेचे नेतेही शिंदे गटात सामील होत असल्याने शिवसेनेला पुण्यात धक्क सहन करावा लागणार आहे.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली होती. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं होतं. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिवतारेंवर ठेवला होता. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारेंनी सांगितले होते.
विजय शिवतारेनंतर पुण्य़ातील एक एक नेते शिंदे गटात सामील होताना दिसत आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश घेतला होता. यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला पुणे माहानगरपालिकेत नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे. त्यात रमेश कोंडे, किरण साळी हे देखील आज मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. त्यानंतर ते त्यांचा निर्णय सुनावणार आहे.
2019 च्या निवडणुकीत रमेश कोंडे हे खडकवासला मतदारसंघातून उमेदवार असतील अशा चर्चा होत्या. मात्र त्यावेळी युती झाल्याने खडकवासला मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला होता. त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. मात्र या त्यांच्या शिंदे गटात सामील होण्याने पुण्यात शिंदे गटाला मोठा शिलेदार मिळण्याची शक्यता आहे.